Breaking News

दखल - भाजपची नाचक्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाचा उल्लेख केला आहे. तिथं जसा विकास जिंकला, तसंच इथंही विकासाच्या मुद्द्यावर लोक भाजपच्या मागं राहतील, असं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचा त्यांनी चांगलाच गौरव केला होता. उत्तर प्रदेशातील निकालाची आता जशी सविस्तर माहिती बाहेर येत आहे, त्यावरून महानगरं वगळता भाजपची मोठी पिछेहाट झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातही या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे जिथं ईव्हीएम मशीनचा वापर झाला, तिथं भाजपला चांगलं यश मिळालं, तर जिथं मतपत्रिकांचा वापर करण्यात आला, तिथं भाजपचं अपयश ठळकपणे नोंदविलं गेलं आहे. 2012 मध्ये उत्तर प्रदेशात जेव्हा महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा लोकसभेतही भाजपला चांगलं यश मिळालेलं नव्हतं आणि विधानसभेतही.



त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ऐंशीपैकी 73 जागा जिंकल्या, तर गेल्या आठ महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 404 पैकी 325 जागा जिंकल्या. या पार्श्‍वभूमीवर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचं मूल्यमापन करावं लागेल. 2012 च्या निवडणुकीत 12 पैकी दहा महानगरपालिकांची सत्ता भाजपनं खेचून आणली होती. आता 16 पैकी 14 महापालिकेत भाजपनं सत्ता आणली आहे. त्यात चार महानगरपालिकांची नव्यानं निर्मिती करण्यात आली आहे. त्यातल्या समाधानाची बाब म्हणजे अयोध्येत कमळ फुललं आहे. मोठ्या शहरांत भाजपला चांगलं यश मिळतं, तसं ते उत्तर प्रदेशातही मिळालं; परंतु मुख्य मुद्दा नगरपालिका व नगरपंचायतीत मिळालेल्या यशाचा आहे. 

तिथं भाजपवर अपक्षांनी मात केली आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष या दोन पक्षांनीही चांगलं यश मिळविलं आहे. अमेठी मतदारसंघातील अमेठीची जागा काँग्रेसनं गमाविली. तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मतदारसंघात भाजपला अपयश आलं, हे ही या निवडणूक निकालाचं वैशिष्ठ्य.

उत्तर प्रदेशमध्ये नुकताच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला यश मिळालं असलं, तरी संपूर्ण राज्यात अनेक जागांवर त्यांच्या उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या 3656 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून 2366 उमेदवार विजयी झाले आहेत. इथं विजयी उमेदवारांपेक्षा पराभूतांची संख्या मोठया प्रमाणात आहे. भाजपच्या पराभूत उमेदवारांपैकी 45 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही आकडेवारी इतर पक्षाच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. पक्षाच्या सर्व जागा धरून विजयाची टक्केवारी ही 30.8 टक्के इतकी आहे. 

नगर पंचायत निवडणुकीत भाजपला फक्त 11.1 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे, भाजपनं या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. राज्यात 12,644 पैकी भाजपनं 8,038 जागांवर उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. यामध्ये सुमारे अर्ध्या जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 664 उमेदवार विजयी झाले आहेत; पण पराभूत उमेदवारांची संख्या ही 1462 इतकी आहे. उत्तर प्रदेशमधील महापौर पदाच्या 16 पैकी 14 जागांवर भाजपचा तर 2 जागांवर बसपचा विजय झाला आहे. मीरत आणि अलीगढच्या महापौरपदी बसपचा उमेदवार विजयी झाला. 

तर अयोध्या-फैजाबाद पालिकेच्या महापौरपदी भाजपचे उमेदवार ऋषिकेश जयस्वाल यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे गुलशन बिंदू यांचा 3601 मतांनी पराभव केला होता. वाराणसी पालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मृदुला या निवडून आल्या. त्यांनी काँगˆेसच्या शालिनी यांचा 78,843 मतांनी पराभव करत इतिहास रचला. संयुक्ता भाटिया या लखनऊच्या पहिल्या महिला महापौर झाल्या, तर कानपूरमध्ये प्रमिला पांडे यांनी विजय मिळवला. गाझियाबाद येथेही भाजपच्या आशा शर्मा यांनी विरोधकांना धूळ चारली. सहारनपूर पालिकेच्या महापौरपदी भाजपचे संजीव वालिया यांनी बसपचे फजल उर्रहमान यांचा दोन हजार मतांनी पराभव केला होता, तर मुरादाबादच्या महापौरपदी विनोद अग्रवाल यांनी काँग्रेसचे मोहम्मद रिजवान कुरेशी यांचा 21 हजार 635 मतांनी पराभव केला.

भाजपनं जेवढ्या गांभीर्यानं या निवडणुकीकडं पाहिलं, तेवढ्या गांभीर्यानं विरोधकांनी त्याकडं पाहिलं नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या अख्ख्या मंत्रिमंडळानं रात्रंदिन एक करून प्रचाराची यंत्रणा उभी केली. स्वत: पायाला भिंगरी बांधून फ़िरले. याउलट, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव तसंच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती या निवडणुकीकडं फिरकल्या नाहीत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून घराबाहेर पडणं दुय्यम लेखलं. भाजपविरोधात काँग्रेस, समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षआनं युती केली नाही. या सर्वांचा निवडणुकीवर परिणाम झाला. 

आता मायावती व अखिलेश यादव ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. अर्थात ईव्हीएम व मतपत्रिकांद्वारे झालेल्या निवडणुकीतील निकाल पाहिले, तर त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असं वाटू लागतं. काँग्रेसला अवघ्या 15 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. बहुजन समाज पक्षाला लोकसभा व विधान सभेच्या निवडणुकीत आलेल्या दारूण पराभवामुळं हा पक्ष संपला असं वाटत असणार्‍यांना मात्र त्यानं दमदार पुनरागमन करून धक्का दिला आहे. पश्‍चिम उत्तर प्रदेशात या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. दलित मतदार पुन्हा मायावती यांच्यामागं यायला लागला आहे. त्यामुळं पुढच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारही त्यांच्यामागं येऊ शकतो. या परिस्थितीत भाजपला अपेक्षित मतांचं धु्रवीकरण झालं नाही, तर लोकसभेला आहे त्या जागा टिकविण्याचं मोठं आव्हान भाजपपुढं असेल एवढं नक्की.