नातेवाइकानेच केली आठ लाख रुपयांची फसवणूक
सोलापूर, दि. 08, डिसेंबर - नातलगानेच ओळखीचा फायदा घेत जवळपास आठ लाख रुपयांची फसवणूक झालेल्या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. फेब्रुवारी 2017 पासून डिसेंबर 2017 पर्यंत अनेक वेळेस असे एकत्रित आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद मंगल शिवाजी कोळी (वय 58, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड) यांनी दिली आहे.
कोळी यांच्या बहिणीचा मुलगा स्वप्निल कांतीलाल हंबीरराव (रा. धुमाळ वस्ती) याने ही फसवणूक केल्याचे म्हटले आहे.हंबीरराव याने फेब्रुवारी 2017 पासून वेळोवेळी कोळी यांच्याकडून जवळपास 12 तोळे सोने आणि 1 लाख 40 हजार रुपये रोख अशी एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. स्वप्निल यालाच मुलगा मानले होते. परंतु या संबंधांचा गैरफायदा घेऊन ही फसवणूक करण्यात आल्याचे कोळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस हवालदार कांबळे करीत आहेत.
