Breaking News

ओखी वादळामुळे आंब्यावर बुरशीची लागण, किडींचा प्रादुर्भाव

रत्नागिरी, दि. 25, डिसेंंबर - अलीकडेच कोकण किनारपट्टीवर झालेल्या ओखी वादळाचा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरचा प्रभाव ओसरला असला तरीही दोन दिवस पडलेल्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात मोहर आलेल्या आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडला आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहरावर बुरशीची लागण आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच या ओखी वादळाचा आंबापिकाला फटका बसल्यामुळे आंबा बागायतदार हवाल दिल झाले आहेत.



वादळाच्या तडाख्याने किनारपट्टीवरील मच्छीमारांचे नुकसान झाले, त्याचप्रमाणे आंबा बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने याची दाखल घ्यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांमधून केली जात आहे. ओखी वादळामुळे 4 डिसेंबरपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याच दरम्यान वारा आणि पावसाचा जोर कायम होता. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्रातील बोटी भरकटल्या. मासेमारीसाठी निघालेल्या बोटी थांबविण्यात आल्या. एकूणच मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. त्याप्रामाणे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या पावसामुळे कलमांचा मोहर, कणीदार आंबे गळून पडले आहेत. फुलोर्यावर आलेला मोहर कुजून गेला आहे. काही ठिकाणी मोहर काळा पडला आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहरावर बुरशीचा आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक आंबा बागायतदारांनी आलेल्या कलमाच्या मोहराच्या संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. ओखी वादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा बागायतदारांना आता नव्याने आंबा मोहराचे संरक्षण क रण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.