दखल - भाजपची झोप उडविणारं खडसेंचं गुपीत?
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या नाराज आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रकात पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर यांच्यावर वेगवेगळे आरोप होऊनही त्यांच्यावर कोणताही कारवाई न करता त्यांना पाठिशी घालून क्लीन चिट देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसे यांना मात्र वेगळा न्याय लावत आहेत. खडसे यांच्याबाबतच्या चौकशीचा अहवाल सादर होऊनही त्याबाबत निर्णय घेत नाहीत. उलट, खडसे यांना प्रस्थापित समजून त्यांना मंत्रिमंडख प्रवेशाचे दार बंद करीत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून भाजप वाढविण्यात खडसे यांचं मोठं योगदान आहे. त्यांची अवस्था आता लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली असल्याचं ते स्वत: च सांगतात. त्यांच्या मनातील खदखद वारंवार व्यक्त होते आहे; परंतु फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आशीर्वाद असल्यानं खडसे यांनी दाद तरी कुणाकडं मागायची, असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रकाश मेहता, चंद्रकांतदादा यांच्यासारखा त्यांना दिल्लीत कुणी गॉडफादर नाही. या परिस्थितीत खडसे यांनी वेगवेगळ्या अधिवेशनात विरोधकांचा किल्ला लढवून स्वत: च्याच पक्षाची कोंडी केली. त्यांनी आपली नाराजी वेगवेगळ्या वेळी दाखवून दिली. भाजपवर सातत्यानं दबाव कसा राहील, असा त्यांचा प्रयत्न असतो. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सरकारची कोंडी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराला अनुपस्थित राहून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यांच्या या नाराजीवर काँग्रेस व राष्ट्रवादीतून वारंवार फुंकर घातली जात आहे. त्यांना वेगवेगळे पक्ष आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वत: खडसे यांनीही आपल्याला पक्षप्रवेशाची निमंत्रणं असल्याचं सांगितलं आहे. खडसे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देऊन भाजप सोडण्याचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं असताना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची तसंच जळगाव येथे अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं; परंतु त्याला काही अर्थ नव्हता. विधानसभेच्या निवडणुकीला अजून पावणेदोन वर्षे बाकी आहेत. त्यामुळं खडसे यांना पक्ष सोडायचा असला, तरी ते इतक्या लवकर निर्णय घेणार नाहीत. नाना पटोले यांच्यासारखं ते बंड करण्याची शक्यता नाही. जळगावच्या कार्यक्रमात खडसे पक्षप्रवेश करण्याची शक्यता नव्हतीच; परंतु तरीही माध्यमांनी बातम्या रंगविल्या. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मलिक यांच्या वृत्ताचं खंडन केलं. भाजपत फार भविष्य दिसत नसल्यानं व मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं डावललं जात असल्यानं खडसे नाराज होणं स्वाभावीक आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेतील नेत्यांचं आपल्या फार्म हाऊसवर जंगी स्वागत करून, त्यांना भोजन देऊन खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ खडसे हे भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत; मात्र 2014 साली भाजप सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांना बसविलं. त्यामुळं खडसे नाराज झाले.
त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातील सर्वांत महत्त्वाचं महसूल खातं देत क्रमांक दोनचं स्थान दिलं; मात्र त्यानंतरही खडसे मुख्यमंत्र्यांना शह देत राहिले. अखेर खडसेंची काही प्रकरणं बाहेर काढण्यात आली. जून 2016 मध्ये त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आठ-दहा खात्यांचा राजीनामा द्यावा लागला. भोसरी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी लावण्यात आली. पत्नी मंदाकिनी व जावयाच्या नावावर भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात मंत्रिपदाचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या स्वीय सहायकांनी लाच घेतल्याचे आरोप होते. अंजली दमानिया यांनी त्यांच्यामागे चौैकशीचं शुक्लकाष्ठ लावलं आहे. मध्यंतरी हॅकरमार्फत खडसे यांच्या मोबाईलवर दाऊद यांचा फोन आल्याचं सांगून त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं दाखविण्याचा प्रयत्नही झाला. अर्थात पाकिस्तानमधून फोन आल्याचा आरोप खडसे यांनी खोडून काढला. खडसे यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली झोटिंग समिती व तिचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगून त्यांना दबावाखाली ठेवलं आहे.
एकीकडं खडसे यांना डावललं जात आहे, तर काँगे्रसमधून एनडीएत सामील झालेल्या नारायण राणें यांना मानाचं पान देण्याची तयारी सुरू आहे. त्याबद्दलही खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांच्यासह खडसे यांनी एका व्यासपीठावर हजेरी लावली. हा कार्यक्रम सर्वपक्षीय असल्यानं त्याबाबत काही विवाद होण्याचं कारण नव्हतं; परंतु पवार यांच्या व्यासपीठावर खडसे जातात, याचं भांडवल केलं गेलं. खडसे इतर पक्षांत प्रवेश करण्याच्या बातम्या पेरून पक्षाला इशारा देत आहेत. मला मंत्रिमंडळात घ्या, अन्यथा मी इतर पक्षात जाऊ शकतो, असं पडद्याआडून सुचवीत आहेत. आयुष्यवर विरोधात राहिल्यानंतर सत्ता काळात तर त्यांच्यावर वनवास भोगण्याची वेळ येत असेल, तर टोकाचा निर्णय घेऊ शकतात; परंतु त्यासाठी योग्य वेळेची ते वाट पाहत असावेत.
मंत्रिपद गमावल्यामुळं भाजपवर नाराज असलेल्या खडसे यांना आमदार सतीश पाटील यांनी राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण दिलं. त्यावर आपल्या मनातील भावना अजितदादांना सांगितली, असं सांगून खडसे यांनी आपल्या राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला. माझ्या राजकीय वाटचालीची अनेकांना चिंता वाटतेय; मात्र आज मी काहीच सांगणार नाही. केवळ अजित पवार यांच्या कानात मी ते सांगितलं आहे. मात्र, ते तुम्हाला कोणालाही कळणार नाही. मी केवळ पक्षवाढीसाठी आजवर काम केलं. पदाची लालसा असती, तर माझ्या 40 वर्षांच्या कार्यकाळात मंत्रिपदाच्या संधीसाठी आपण कधीच भाजपला लाथ मारून बाहेर पडलो असतो, असं त्यांनी सांगितलं. सध्या राज्यभर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडून प्रचार केला जात आहे. अजितदादा, असला प्रचार तुम्हीच हस्तक्षेप करून थांबवा. कारण आतापासूनच तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा प्रचार केला, तर उगीच तुमच्या मागं चौकशा लागतील, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी अजित पवार यांना दिला.
पवार यांनीही खडसे यांच्या कामाचं कौतुक केलं. आम्ही सत्तेत असताना खडसे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेलं काम, त्यांचा राजकीय संघर्ष खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. खडसे यांनी त्यांच्या मनातील ज्या भावना माझ्या कानात सांगितल्या आहेत, त्या खडसे तुम्हाला सांगणार नाहीत व मीही सांगणार नाही; मात्र खडसे यांच्या या कानगोष्टींमुळं भाजप-शिवसेनावाल्यांना झोप लागणार नाही हे मात्र नक्की, असा टोला अजित पवार यांनी लगावला. पवार व खडसे यांच्या कानगोष्टी दोन्ही पक्षांच्या झोपा मोडणार असतील, तर ती झोप उडविण्याची प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार, असा प्रश्न राज्यातील जनतेला नक्कीच पडला असेल. अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्यावरील आरोपांची तत्काळ चौकशी होऊन त्यांना क्लीन चीट देत पुन्हा पदावर घेण्यात आलं. हाच न्याय खडसे यांना का लागू केला जात नाही?
त्यांच्या चौकशीला का तारीख पे तारीख? असे प्रश्न विचारून अजित पवार यांनी खडसे यांच्या जखमांवर हळुवार फुंकर मारली एवढं नक्की. जळगावच्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी खडसे राष्ट्रवादीत येत असल्याच्या चर्चेबाबत भाषणात उल्लेख केला. त्याचा संदर्भ घेऊन बोलताना पवार यांनी सांगितलं, की राजकारणापलीकडं काही ठिकाणी सर्वजण एकत्र येतात. त्यामुळं प्रत्येकाला त्या वेगळ्या नजरेनं बघायची गरज नसते. मात्र, राजकारणात समीकरणं बदल असतात. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं सांगत काही संकेतही त्यांनी दिले. राजकारणात काही जणांना तथ्य नसतानाही बदनाम केलं जातं. त्यांची 40 वर्षांची तपश्चर्या असून, तिला धक्का लागतो. त्यांच्या कामांचा विचार होणं आवश्यक आहे, असं सांगत पवार यांनी खडसे यांच्याबद्दल सहानुभती व्यक्त केली.