Breaking News

काटेरी कुंपनातून वाहतात गोदावरी कालवे पाटबंधारे विभागाची भूमिका संशयास्पद


कोपरगांव ता. प्रतिनिधी - तालुक्यात शेतकऱ्यांचा प्राण असलेला गोदावरी डावा कालव्यावर संपूर्ण तालुक्याचा पाणीपुरवठा आणि लाभधारक शेतकरी अवलंबून आहेत. गतकाळात या कालव्याच्या भराव्यावरुन चालतानाही कुठल्याही व्यक्तीला कडेची वृक्ष आणि कालव्याची सफाई पाहून पर्यटनाला आल्याचा भास होत होता. या विभागाच्या कालवा परिसरातील कार्यालयात अनेक शाळा वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी येत होत्या. मात्र सध्या या कालव्यांच्या दुतर्फा काटेरी झुडपांचे साम्राज्य असून त्यातून मार्ग काढत पाणी वाहत असल्याचे दिसून येते.
पाटबंधारे विभागाचे कर्मचारी केवळ आवर्तन आल्यानंतर स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी फिरकत असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे. मात्र अनेक वर्षांपासून कालव्याची देखभाल तशी शून्यच आहे. तीन वर्षांतून एकदा कालव्याची साफसफाई होणे आणि लाभधारक शेतकऱ्यांसाठी चाऱ्या उकरुण देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असूनही अधिकारी मात्र दंडेलशाहीच्या भूमिकेत वावरत आहेत. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चाऱ्या उकरुन, कालवा सफाई करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. त्याबाबत कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी मुख्य कार्यकारी आभियंता राजेंद्र शिंदे यांच्याकडे मागणी करुन त्यांनी तसा तत्काळ तोंडी आदेशही दिला होता. मात्र अधिकाऱ्यांनी कालव्याला आवर्तन सोडून या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभाराबद्दल तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. 

यंदा रब्बीसाठी दोन तर उन्हाळ्यात तीन अशी पाच आवर्तने देण्यात येणार आहे. या काटेरी झुडपांमुळे कालवा फुटीला साडेसाती लागलेली असून सध्या डावा कालवा तर नाल्यासारखा भासतो आहे. कालव्यातून ओंजळीत पाणी घेण्यासाठीही काही ठिकाणी जागाच शिल्लक नसल्याचे दिसून येते. यात कमी दाबाने पाणीपुरवठा करुन केवळ आवर्तनातील पाणी चोरण्याचा हा डाव असल्याची शंका आहे.

याबाबत पाटबंधारे विभागाचे भास्कर सुराळे यांनी शासनाने गोदावरी महामंडळाकडे हे काम दिले असल्याचे सांगून जबाबदारीचे घोंगडे झटकवण्याचा प्रयत्न केला असला तर मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या आदेशावर निश्चित प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील चर्चा नुसतीच पारावरील गप्पांसारखी रंगते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.