Breaking News

सख्या भावाचा खून केल्याच्या आरोपावरून भाऊ, भावजयीला जन्मठेप

अहमदनगर : जमिनीच्या वाटपाच्या वादातून पारनेर तालुक्यातील बिबीचा दरा, म्हसोबा झाप येथे सख्या भावाला मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केल्याच्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांनी आरोपी भाऊ व भावजयीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.जमिनीच्या वादातून सवाचा खून करण्याची ही घटना 27 मे 2015 रोजी घडली होती. 


या बाबत ची माहिती अशी की,कुशाबा बन्सी दुधवडे (वय60) व त्यांची पत्नी सोनाबाई कुशाबा दुधवडे (वय 50,दोघे राहणार बिबीचा दरा,म्हसोबा झाप,तालुका पारनेर)अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.गोविंद बन्सी दुधवडे असे या घटनेतील मृत व्यक्ती चे नाव आहे. आरोपी कुशाबा व मॄत गोविंद हे दोघे सख्खे भाऊ होते.जमिनीच्या वाटपावरून दोघांमध्ये मोठे वाद होते.27 मे 2015 रोजी कुशाबा,त्यांची पत्नीसोनाबाई व मुलगा गणेश यांनी गोविंद यांच्या घरात प्रवेश करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच मारहाण करीत तिघांनी गोविंद यांना घराबाहेर ओढून आणले व कुशाबा याने दोन्ही हातांनी गळा दाबून गोविंद यांचा खून केला.ही घटना घडली त्यावेळी मृत गोविंद यांची पत्नी सिताबाई ही एकमात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती.गोविंद यांच्या पत्नी सिताबाई दुधवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात झाली.सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रामदास गवळी यांनी काम पाहिले.सुनावणी दरम्यान एकूण 5 साक्षीदार तपासण्या त आले.त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सिताबाई,वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.सुनावणी अंती न्यायालयाने आरोपी कुशाबा बन्सी दुधवडे(वय60) व त्यांची पत्नी सोनाबाई कुशाबा दुधवडे या दोघांनाही दोषी ठरवून जन्मठेप व 2 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.