Breaking News

उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानक पुलावरील चेंगराचेंगरीत मृत झालेल्या प्रवाशांच्या कपाळावर क्रमांक टाकल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. त्या बरोबरच केईएम रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.माहितीचा अधिकार कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


या याचिकेत केंद्र सरकार, रेल्वेसह अन्य यंत्रणांना उत्तर देण्याचे निर्देशा न्यायालयाने या सुनावणी दरम्यान दिले. या संदर्भात 18 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मृत प्रवाशांच्या कपाळावर क्रमांक टाकणे चुकीचे आहे. मृतदेहांचा सन्मान करायला हवा असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. या प्रकाराबाबत मृतांच्या नातेवाईकांकडून जाब विचारला असता त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले, अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी विचारणाही न्यायालयाने सरकारकडे केली. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणखी सक्षम यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता आहे, असे मतही न्यायालयाने या वेळी नोंदवले.