Breaking News

रेल्वेस्टेशन परिसरातील भुयारी मार्गाचा तिढा सुटण्यास प्रारंभ


राहुरी प्रतिनिधी - राहुरी रेल्वेस्टेशन परिसरातील भुयारी मार्गाच्या कामाची ई-निविदा रेल्वेच्या सोलापूर विभागाने प्रसिध्द केल्या आहेत. त्यामुळे येथील भुयारी मार्गाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील वांबोरी स्टेशन ते बेलापूरमधील ( श्रीरामपूर ) ६ रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राहूरी रेल्वेस्टेशन येथील गेटचाही समावेश आहे. याठिकाणी भुयारी मार्ग होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 
मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागाकडून याबाबत ई-निविदा प्रसिद्ध झाल्याने राहूरी रेल्वे स्टेशनला आता भुयारी मार्गाची असणारी प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ई-निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यात वांबोरी स्टेशन ते बेलापूरदरम्यान सहा रेल्वेगेट बंद करण्यासाठी व भुयारी मार्ग करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये राहूरी रेल्वेस्टेशन, टाकळीमिया - राहूरी रेल्वे स्टेशन ( गेट नं-४१ ), मुसळवाडी - टाकळीमियारोड ( गेट नं- ४२ ), गेट नं- ४३, पढेगाव ते बेलापूर ( गेट नं- ४७ ), व गेट नं- ४८ यांचा समावेश आहे. या कामांवर १० कोटी १४ लाख ३० हजार ३३७ रूपये खर्च अपेक्षि आहे. राहूरी रेल्वेस्टेशन येथे निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ६ मिटर बाय ६ मिटर असा भुयारी मार्ग ( कट व कव्हर मेथड द्वारे ) या पध्दतीने बांधण्याबाबत सुचित केले आहे. तसेच रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यापूर्वी भुयारी मार्गाची तरतूद करण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी दि. ११ जानेवारी २०१८ पर्यंत ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, राहुरी रेल्वेस्टेशन या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग तयार करावा, अशी पूर्व भागातील तांदुळवाडी, कोंढवड, आरडगाव, शिलेगाव, करपरावाडी, केंदळ खुर्द, केंदळ बु., मानोरी, वळण, मांजरी, पिंप्री वळण, चंडकापूर, मुसळवाडी, वने वस्ती, इंगळे वस्ती आदी परीसरातील गावांतील ग्रामस्थांची मागणी होती. रेल्वेगेट सातत्याने बंद राहत असल्याने प्रवाशांना नेहमीच ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ई-निविदा जाहिर केल्याने आता भुयारी मार्गाचा प्रश्न संपणार असल्याने राहुरी तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.