Breaking News

निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहूले

नवी दिल्ली : गुजरातमधील विधानसभा निवडणूकीसाठीचे मतदान गुरूवारी संपले असले, तरी या शेवटच्या दिवशी काँगे्रस व भाजपा आमनेसामने आले असून, त्यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसुत्री बाहूले झाल्याचा खळबळजनक आरोप काँगे्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. 


काँगे्रसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दुसर्‍या टप्प्यातील मतदान संपण्यापूर्वीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यामुळे निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. तर मतदान करण्यासाठी जात असतांना, पंतपधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला, मात्र यावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे काँगे्रस आक्रमक झाली असून, राहूल गांधीसाठी वेगळा न्याय व पंतप्रधान मोदी यांच्यासाठी वेगळा न्याय कशासाठी असा सवाल काँगे्रसच्या वतीने करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी मतदान केल्यानंतर काँगे्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारपरिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. 


गुजरातच्या निवडणुकीचे पडसाद आता राजधानी दिल्लीतही उमटले असून, पंतप्रधानांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. एवढंच नाहीतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव देखील घातला. पण पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. निवडणूक आयोग भाजपच्या हातातले बाहुले झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आयोगात धाव घेत आपले म्हणणे सादर केले.


राहुल गांधींनी साधी मुलाखत दिली तर आयोग त्यांना कारणेदाखवा नोटीस पाठवते पण त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी रोड शो करूनही आयोग त्यांच्यावर काहीच कारवाई का करत नाही ? असा सवाल करत पंतप्रधानांच्या राजकीय दबावामुळेच आयोग भाजपविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला.