Breaking News

सातबारा व फेरफारचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात


सातारा, दि. 02, नोव्हेंबर - सातबारा व फेरफारचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत 13 लाख 57 हजार 235 सातबारा उतारे संगणकीकरणाचे काम झाले असून, 96 टक्के पूर्ण झाले आहे. आता प्रत्येक संगणकीकृत सातबारा मूळ हस्तलिखितांशी तंतोतंत जुळविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील एक हजार 714 महसुली गावांपैकी एक हजार 74 गावांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहेत. 

सातबारा संगणकीकृत करून तो घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. यानुसार डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीक रण कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाने डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू केले होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या मूळ हस्तलिखित सातबाराशी जुळ विण्याचे काम सुरू आहे.


सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी चावडी वाचन करून त्यामध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 14 लाख पाच हजार 38 इतकी सातबार्‍यांची संख्या आहे. त्यापैकी 13 लाख 57 हजार 235 सातबार्‍यांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहेत. 47 हजार 803 सातबार्‍यांचे संगणकीकरण अद्यापही बाकी आहे.