Breaking News

शाळांमध्ये वीर लहुजी साळवे यांची प्रतिमा व पुस्तक भेट देण्याच्या उपक्रमास निंबोडी येथून प्रारंभ

मरेन तर देशासाठी, जगेल तर देशसाठी अशी क्रांतीकारक प्रतिज्ञा करुन, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भुमिका बजावणारे वीर लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास भावी पिढीला समजण्यासाठी व त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांच्या अंगी रुजण्यासाठी जय लहुजी ग्रुपच्या वतीने नगर तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये लहुजी साळवे यांची प्रतिमा व जीवनचरित्रावर पुस्तक भेट देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ निंबोडी (ता.नगर) येथून झाला. 


निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळा व रेणुकामाता माध्यमिक विद्यालयास भरत पवार व अंकुश मोहिते यांच्या हस्ते लहुजी साळवे यांची प्रतिमा व जीवनचरित्रावर पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी लहुजी महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अंबादास गाडे, लहुजी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मयुर लोखंडे, ग्रुपचे अध्यक्ष राहुल शेंडगे, सागर साळवे, राजू रोकडे, चंदू काळोखे, मार्गदर्शक सतीश गाडे, पांडूरंग गाडे, अर्जुन शिंदे, प्रवीण शेंडगे, विनोद उल्हारे, देवीदास इंगळे, रमेश शेंडगे, विजू साळवे, जयराम बेरड, चंदू काळूंखे, गणेश चांदणे आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात अंबादास गाडे यांनी सक्षम भारताच्या निर्मितीसाठी लहुजी साळवे यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांचे विचार व कार्य भावीपिढीला समजण्यासाठी शाळेला प्रतिमा व ग्रंथालयास त्यांची जीवनचरित्रावर पुस्तक भेट देण्याच्या उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगितले. राजू रोकडे यांना मातंग समाजभुषण मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.


सागर साळवे म्हणाले की, वीर लहुजी साळवे यांनी देशातील पहिले तालिम युध्द कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात सुरु केले. आपल्या अंगी असलेले युध्दकलेचे शिक्षण तरुणांना दिले. अनेक जहाल क्रांतीकारक त्यांच्या आखाड्यात तयार झाले. बहुजनांना शिक्षणाचे दार उघडे करुन देणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण चळवळीसाठी त्यांनी सहकार्य केले. भावी पिढीला त्यांच्या कार्याचा विसर पडत चालला असून, जय लहुजी ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

सतीश गाडे यांनी घराघरात लहुजी साळवे यांचे विचार गेल्यास सशक्त भारताची निर्मिती होणार आहे. तर युवकांना त्यांच्या विचाराने दिशा मिळणार असल्याचे सांगून, वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी (जि.पुणे) येथील समाधीस्थळी स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी एकसंघपणे शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. निंबोडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने रत्नप्रभा क्षीरसागर, सुनिल साठे, हेमंत भागवत, सुनिल गवळी तर रेणुकामाता माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्यध्यापक दिलीप पवार, दतात्रय सरोदे, आनंदा नरसाळे, सुभाष लगड यांनी लहुजी साळवे यांच्या प्रतिमा व पुस्तकाचा स्विकार केला. तसेच शाळेत लहुजी साळवे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याची आग्रही विनंती उपस्थितांनी केली.