Breaking News

मेळघाटामधील विकास कामांना प्राधान्य द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर : सर्वांसाठी घरे, कृषी पंप वीज जोडणी, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहिरी, मागेल त्याला शेततळे, विविध आवास योजना या लोककल्याणकारी योजना असून, सर्वस्तरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे गतीने पूर्ण करावी, तसेच मेळघाटमधील कुठलेही काम अपूर्ण राहता कामा नये. तेथील विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात झालेल्या अमरावती जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रवी राणा, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर व श्रीमती यशोमती ठाकूर, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.बांगर यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार धडक सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कर्जमाफी, कृषी व आवास योजना आदींचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला.