श्रीगोंदा तालुक्यात ‘तळीरामांच्या’ विमानाला भेसळीचं ‘इंधन’!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जवळपास पाच महिने दारूबंदी होती. या दारूबंदीच्या काळातच मोठ्या प्रमाणात लोकल मेड आणि बनावट दारूची कधी चोरीछुपे तर कधी खुलेआमपणे विक्री सुरू झाली होती. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या ब्रँडखाली तालुक्यातील अनेक धाबे आणि बंद पडलेल्या दारू दुकानांमधून सर्रासपणे ही बनावट दारू विकली जात होती. या लोकल मेड दारूची कोणत्याही कंपनीच्या ब्रँडची एक क्वार्टर विक्रेत्यांना साधारणत: 40/- ते 50/- रुपयांना मिळते.
दारूबंदीच्या काळात हीच क्वार्टर जवळपास दोनशे रुपयांना विकून एका क्वार्टरमागे विक्रेते जवळपास 150/- रुपये मिळवत होते.आता बहुतेक गावांमधील दारूबंदी उठली असली तरी लोकल मेड दारू विकून दाम दुप्पट पैसे मिळवण्याची चटक अनेक दारू विक्रेत्यांना लागून राहिलेली आहे. त्यामुळे दारू दुकाने सुरू होऊनसुद्धा अनेक दारू दुकानांमध्ये आणि बारमध्ये नामवंत कंपन्यांच्या ब्रँडच्या नावाखाली लोकल मेड आणि बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. नामवंत कंपन्यांची साधारणत: 150/- रुपयांची बाटली 160/- रुपयांना विकून बाटलीमागे केवळ 10/- रुपये मिळवण्याऐवजी 40/- रुपयांची बनावट दारू 150/- रुपयांना विकून एका बाटलीमागे जवळपास शंभर रुपये कमावण्याचा फंडा अनेक दारू दुकानांमध्ये सुरु आहे.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील काही बार आणि अवैध धाबे या दारू दुकानांमध्ये हा उद्योग सुरू असल्याचे दिसते.शहरी भागातील काही बार मध्येही या बनावट दारूची विक्री होताना दिसत आहे.ही बनावट दारू बाह्य रूपावरून किंवा बाटलीच्या आकारावरूनसुद्धा सहजासहजी ओळखू येत नाही. दररोज एकाच ब्रँडची दारू पिणार्याला मात्र ही दारू पिल्यानंतर लगेचच त्यातील बनावटगिरी ओळखता येते. एखाद्या कस्टमरने ही बनावटगिरी ओळखली तर लगेच हुज्जत आणि काही वेळेस हाणामार्याही होतात. त्यामुळे अशा ‘दर्दी’ कस्टमरला सहसा ही बनावट दारू दिली जात नाही.
मात्र, मिळेल ती पिणारे किंवा कधीतरी पिणार्यांच्या गळ्यात ही बनावट दारू नेमकी मारली जाते. अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या बनावट दारूचा रतीब घातला जात असल्याचे दिसत आहे.पूर्वी बनावट किंवा लोकल मेड दारू ही प्रामुख्याने सीमावर्ती भागातून आणि गोव्यातून येत होती.मात्र,अशी बनावट दारू बनविण्याचे तंत्र अवगत करून काहीजणांनी ठिकठिकाणी हा ‘लघुउद्योग’ सुरू केल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने मध्यरात्रीनंतर एखाद्या वाहनातून आवश्यक किंवा मागणी असलेल्या दारू दुकानांमध्ये या बनावट दारूचा ‘रतीब’ घातला जातो. गेल्या काही दिवसांपासून तर या बनावट दारूची आजुबाजूच्या गावात ‘निर्यात’ केली जाताना दिसत आहे. या प्रकारांना वेळीच अटकाव केला नाही तर बनावट दारूच्या बाबतीत पुन्हा एकदा पागरमल घडल्या शिवाय राहणार नाही असे नागरीकातून बोलले जात आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्यामुळे याबाबत नागरीकातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.-
