जीवदान दिलेल्या रानडुकराच्या हल्ल्यात तीघे गंभीर जखमी
गडचिरोली :- विहिरीत पडलेल्या रानडुकराला जीवदान दिल्यानंतर या रानडुकराने गावात धुमाकूळ घालत तीन जणांना जखमी केले. ही घटना ६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.हरिभाऊ गणपती नेवारे (७०), पत्रू गणपती कोठारे (६०) व संगीता विलास पिपरे (३५) अशी जखमींची नावे आहेत. घोट येथील गणपती दुधबावरे यांच्या विहिरीत रानडुकर पडले असल्याची बाब निदर्शनास आली.
यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे, वनरक्षक भांडेकर व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या सहकार्याने रानडुकराला सुरक्षितरीत्या विहिरीबाहेर काढले. जीवदान देण्यात आलेल्या रानडुकराला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवण्यात आले होते.
मात्र, रानडुक्कर दोरी तोडून प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या दिशेने सैरावैरा पळू लागले. यादरम्यान, रानडुकराने हरिभाऊ नेवारे यांना धडक दिली. त्यानंतर घरासमोर बसून असलेल्या पत्रू कोठारे यांनासुद्धा जखमी केले. तसेच अंगणात काम करीत असलेल्या संगीता पिपरे यांनाही जखमी केले.
