Breaking News

मौखिक आरोग्य तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवा - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

नागपूर‍ : मौखिक कर्करोगाचा वेळेत प्रतिबंध व्हावा व योग्य उपचार व्हावे, यासाठी राज्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम सुरु आहे. राज्यात नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, भंडारा तसेच जळगाव या जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत सर्वाधिक रूग्णांची तपासणी करण्यात हे जिल्हे पुढे आहेत. उर्वरित जिल्ह्यांनी देखील या मोहिमेला अधिक व्यापक आणि यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी केले.
आरोग्य उपसंचालक, माता कचेरी येथील सभा कक्षात आज आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त संचालक ( मानसिक आरोग्य व संसर्गजन्य रोग) श्रीमती साधना तायडे, अतिरिक्त संचालक (कुटुंब कल्याण), श्रीमती अर्चना पाटील, नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय जयस्वाल तसेच आरोग्य विभागाचे संबंधीत पदाधिकारी उपस्थित होते.