Breaking News

जनतेला न्याय न देणार्‍या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणार - अजित पवार


यवतमाळ, दि. 02, नोव्हेंबर - माझ्या राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या भाजप-सेनेच्या सरक ारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे आणि आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत व्यक्त केला.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये या खोटारडया आणि नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये कर्जमाफीच्या मुद्याला पुन्हा हात घातला. आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकर्‍यांची 71 हजार कोटीची कर्जमाफी झाली. परंतु आत्ताचे सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफीची तारीख पे तारीख देत आहे. हे सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी देवू शकणार नाही कारण हे सरकारच कर्जबाजारी झाले आहे. खोटया जाहिराती देवून हे सरकार आपल्या करातून जमा होणार्‍या पैशावर डल्ला मारताना दिसत आहे असा घाणाघाती आरोपही अजित पवार यांनी केला.
अजित पवार यांचे भाषण सुरु असतानाच वकील संघटनांनी सरकारच्याविरोधात हल्लाबोल करत जाहिर सभेच्याठिकाणी प्रवेश केला.त्यावेळी अजित पवार यांनी वकील संघटनांचे स्वागत केले. यावेळी मोठया संख्येने वकील सहभागी झाले होते. राज्यातील सरकारच्याविरोधात एवढया मोठयाप्रमाणात वकील संघटना उतरते त्याबद्दल अजित पवारांनी त्यांना धन्यवाद दिले.