औरंगाबादेत एकाच रात्रीत 3 सराफा दुकानांसह 2 घरफोड्या
औरंगाबाद, दि. 29, डिसेंबर - फुलंब्री तालुक्यात एकाच रात्रीत चोरट्यांनी 3 सराफा दुकानांसह 2 घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. यातील एक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे.
बाबरा येथे हरी ओम ज्वेलर्स येथून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. या प्रकरणी दुकान मालक शिवनारायण सोनवने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच, येथील बालाजी ज्वेलर्स या दुकानामधून 32 हजार रुपये किमतीचे दागिने आणि 13 हजार रुपये रोख रक्कम चोरली. तर, तिसरे फोडण्यात आलेले दुकान शिव ओम ज्वेलर्स येथून सोने चांदी अलंकार व रोख रक्कम चोरीस गेल्याचे समोर आले आहे.
दुकान फोडणार्या चोरांनी दोन घरांमध्येही चोरी केली आहे. शिवओम ज्वेलर्स या दुकानाच्या इमारतीमध्ये राहाणार्या निलिमा पुजारी यांच्या घरातून दीड लाखाचा ऐवज व रोख रक्कम लंपास झाली आहे. सर्व ठिकाणच्या केलेल्या चोरीमध्ये एकूण 6 लाख 55 हजार रुपयावर डल्ला मारल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.