काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
श्रीनगर/वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात गुरूवारी लष्कराला यश आले. लष्कर व राज्यांच्या पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कुलगामसह तीन भागांमधून तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तीनपैकी एक दहशतवादी जखमी आहे.
ऑपरेशन हलनकुंडच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जोपर्यंत आवश्यकता असेल, तोपर्यंत हे अभियान सुरुच ठेवण्यात येईल. अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. 14 नोव्हेंबरपासून ऑपरेशन हलनकुंड सुरु असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खान म्हणाले, काश्मिरी तरुणांना आमिष दाखवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेतले जात आहे. त्यासाठी पाकिस्तानमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार सुरु आहे. पोलिस आणि लष्करात चांगला समन्वय असून, हशतवादाचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन हलनकुंड सुरुच राहणार आहे. स्थानिकांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन खान यांनी केले.
काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यात येत असल्याने अनेक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील 20 वर्षांचा माजिद खान दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. जिल्हा स्तरावरील फुटबॉलपटू असलेला माजिद अनंतनागचा रहिवासी होता. माजिदने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याने त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
