Breaking News

चोपडा येथील घराला आग; एक लाखांचे नुकसान

जळगाव, दि. 12, नोव्हेंबर - अडावद ता. चोपडा येथील केजीएन नगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झालेली नाही.


यावल-चोपडा रस्त्यावरील केजीएन नगरातील रहिवासी अब्दुल गफ्फुर पिंजारी यांच्या घराला दुपारी अचानक आग लागली. घरातून धुराचे लोळ निघू लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती.
अखेर चोपडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. अवघ्या 15 मिनिटात बंब 
दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील टिव्ही, फ्रिज, कपाट, अन्नधान्यासह आदी संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे पिंजारी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे पिंजारी कुटुंबाचे म्हणणे आहे.