विकासकामे करण्याऐवजी चमकोगिरी केल्याचा काँग्रेसचा आरोप
औरंगाबाद, दि. 12, नोव्हेंबर - केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने नागरिकांना विकासाचे स्वप्न दाखवले होते. ‘अच्छे दिन’ येणार म्हणून मतदारांनी त्यांना कौलही दिला. परंतु, गेल्या तीन वर्षांत सरकारने विकासकामे करण्याऐवजी चमकोगिरी करण्यात अधिक वेळ घालवल्याचा आरोप काँग्रेसने काढलेल्या जन आक्रोश आंदोलनात केला.
आजपर्यंत सरकारने फक्त घोषणांचा वर्षाव केला. मात्र, त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले नसल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले. क्रांती चौकातून जिल्हा काँग्रेसने मोर्चा काढला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेत आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, दुधाला 30 रुपये प्रतिलिटर दर द्यावा, शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, बेरोजगारास नोकरी द्यावी, शेतमालास हमी भाव यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.