रामचंद्र वेलणकर यांना सांगली भूषण पुरस्कार जाहीर.
सांगली, दि. 12, नोव्हेंबर - विश्वजागृती मंडळाच्यावतीने यंदा विव्हिंग मिल्सचे मालक प्रसिध्द उद्योगपती रामचंद्र विष्णूपंत वेलणकर यांना सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती अरूण दांडेकर यांनी शनिवारी दिली.
विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणा-या व्यक्तीस विश्वजागृती मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी सांगली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार रामचंद्र वेलणकर यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख 25 हजार रूपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे.
विविध क्षेत्रात सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणा-या व्यक्तीस विश्वजागृती मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी सांगली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार रामचंद्र वेलणकर यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख 25 हजार रूपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे.
यापूर्वी नेत्र विशारद डॉ. भैय्यासाहेब परांजपे, खासदार अण्णासाहेब गोटखिंडे, प्रख्यात गायिका आशा भोसले, राजमती आक्का पाटील, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, स्वातंत्र्यसैनिक धोंडिरामबापू माळी, उद्योगपती बाबूकाका शिरगावकर, कवी सुधांशू, गोवा स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे, नटवर्य मास्टर अविनाश, प्रसिध्द सुवर्ण व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, बुध्दिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर, कृषीभूषण प्रं. शं. ठाकूर, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, ऍड. शशिकांत पागे, डॉ. एस. बी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, प्रा. म. द. हातकणंगलेकर, उद्योगपती नानासाहेब चितळे व ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना या मानाच्या सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
उद्योग विश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक भान ठेवून वाटचाल करणार्या रामचंद्र वेलणकर यांचा दि. 19 नोव्हेंबर 1926 रोजी जन्म झाला. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सांगली शहरात उद्योगाचा पाया घालणार्या वि. रा. वेलणकर यांचे रामचंद्र वेलणकर हे चिरंजीव आहेत.
सध्या ते 91 वर्षांचे आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून रामचंद्र वेलणकर यांनी गत 63 वर्षे गजानन विव्हिंग मिल्सची जबाबदारी सांभाळली आहे. अनेकविध संकटातून हा उद्योग वाढवून त्यांनी या उद्योगात आपल्या मुलींनाही सामावून घेतले.
राज्यातील कापड व सूत उद्योग सध्या अडचणीत आहे. मात्र रामचंद्र वेलणकर व त्यांच्या मुलींनी अशा कठीण परिस्थितीतही अत्यंत जिद्द व आपल्या काटेकोर योग्य नियोजनाने गजानन विव्हिंग मिल्स चालविण्याची अवघड गोष्ट लिलया साध्य करून दाखवली आहे.
उद्योगाबरोबरच चारित्र्य व नीतीमूल्य जोपासण्यासाठी आपल्या वडिलांपेक्षाही अधिक कष्ट रामचंद्र वेलणकर यांनी घेतले. त्यांची सामाजिक जाणीवही अत्यंत तीव्र आहे. विविध सामाजिक कार्यात त्यांचा वेगळा ठसा प्रत्येक कार्यक्रमातून दिसून आलेला आहे. अनंत अडचणीतून मार्गक्रमण करीत प्रत्येक काम चिकाटी व प्रामाणिकपणे पूर्णत्वास नेण्याचा मार्ग त्यांनी कधीही सोडला नाही.
गरिब व अनाथ मुलींसाठी कार्यरत असलेल्या येथील वेलणकर अनाथ बालकाश्रम या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही रामचंद्र वेलणकर आज कार्यरत आहेत. आजवर त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लाखो रूपयांचे दान गरजू व्यक्तींना केले आहे.
गजानन विव्हिंग मिल्सची मालकी आपल्या मुलींच्या नावे करून उद्योग क्षेत्रात एक नवा पायंडा त्यांनी पाडला आहे. त्यांच्या या सर्व कार्याचा गौरव करण्याच्या हेतूनेच रामचंद्र वेलणकर यांना विश्वजागृती मंडळाच्यावतीने यंदाच्या सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे अरूण दांडेकर यांनी सांगितले.