Breaking News

राष्ट्रीय विधी सेवा दिननिमित्त पथसंचलन

बुलडाणा, दि. 10, नोव्हेंबर - राष्ट्रीय सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा  तथा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त दि.9 नोव्हेंबर रोजी पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. पथसंचलनाची सुरुवात जिल्हा व सत्र  न्यायालय बुलडाणाचे प्रांगणात करण्यात येवून बुलडाणा शहरातून पथसंचलन करुन जिल्हा न्यायालयात समारोप करण्यात आला. पथसंचलनामध्ये मानसिक आरोग्य कायदा,  मध्यस्थी काळाची गरज, विधी सेवा काळाची गरज, न्याय सर्वांसाठी, वादापेक्षा संवाद बरा, सामाजिक स्वास्थ व नैतिकता वाढीत मदत होईल, लोकन्यायालयाच्या निवाडया विरूध्द  अपील नाही,  लोकन्यायालयात झालेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फी परत मिळते, लोकअदालतीचा घ्या फायदा वेळ वाचवा, पैसा वाचवा, भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच  आनंद खरा, मग वाट कसली पाहता, संधीचा लाभ घ्या व परस्परांतील वादांना पूर्णविराम द्या, विधी सेवा मार्फत मोफत सल्ला व गरजू लोकांना सरकारी खर्चाने वकिल दिल्या जातो,  विधी सेवा मार्फत तळागळातील लोकांना कायद्याबाबतचे मोफत मार्गदर्शन दिल्या जाते, लोकन्यायालयात वाद मिटे, टिकून राहिल सन्मान वेळ पैसा दोन्ही वाचे, शिवाय मिळे  समाधान, विधी सेवा मार्फत मानसिक आरोग्य दिन, बालक दिन, महिला दिन, तसेच जेष्ठ नागरिक दिन, चाईल्ड लाईन या विषयावर नारे देऊन जनजागृती करण्यात आली.
सदर पथसंचलनाला श्रीमती सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलडाणा यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. या पथसंचलनामध्ये प्र.ल.गजभिये, जिल्हा न्याय धिश -1, आर.एस.तिवारी जिल्हा न्यायधिश -2, एन.आर.तळेकर मुख्य न्यायदंडाधिकारी, शै.अ.बाफना सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, श्रीमती आर.आर.देशपांडे,  सह दि.न्या.क.स्तर, श्रीमती एस.एम.जोशी, तिसरे सह दि.न्या.क.स्तर, श्रीमती.एन.के.नागरगोजे, चतुर्थ सह दि.न्या.क.स्तर, अमोल बल्लाळ, जिल्हा सरकारी अभियोक्ता, राजकुमार  दी.देवकर, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, बुलडाणा, व इतर विधिज्ञ मोठया संख्येने हजर होते. श्रीमती. रहाणे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी तसेच श्रीमती चांदेकर एनजीओ  व इतर पीएलव्ही हजर होते. ए.बी.शेख प्रबंधक, जिल्हा न्यायालय बुलडाणा, श्रीमती सुप्रिया देशमुख, न्यायालय व्यवस्थापक, दि.च.तोमर, अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी इत्यादी रॅलीमध्ये सहभागी होते तसेच रॅलीमध्ये नर्सिग कॉलेजचे विद्यार्थी हे प्रामुख्याने हजर होते.  सदर रॅलीला सकाळी 09:15 वा. सुरूवात करण्यात आली व ठीक सकाळी 10:15 वा. संपवण्यात आली.