पाथर्डीत पत्नीची ऑर्डर नियमित न झाल्याने सरपंचावर झाला हल्ला
संपत गायकवाड यांच्या पत्नी संगिता गायकवाड हिच्या फिर्यदिवरून देविदास शंकर काळे व त्याचा सोबत या कटामध्ये सामील असलेले अशोक भाऊसाहेब कांबळे याच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्य भा.द.वि कलम ३०७,अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा कलम ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून समजलेली अधिकची माहिती अशी की,संपत गायकवाड यांची पत्नी आणि काळे यांची पत्नी वर्धमान आश्रम शाळा माणिकदौडी येथे स्वयंपाकी म्हणून काम करत होते.संपत गायकवाड यांचे पत्नीचे आश्रम शाळेवर कामाची ऑर्डर नियमित झाली. तर देविदास काळे यांच्या पत्नीची ऑर्डर नियमित झाली नाही. याचा काळे यांचा मनात राग होता.
तसेच संपत गायकवाड यांचा घरासमोर राहणाऱ्या भाऊसाहेब कांबळे व गायकवाड यांच एक वर्षपूर्वी वाद झाले होते.तेव्हा कांबळे यांनी गायकवाड यांना मारहाण केली होती.त्यावेळी त्याची तक्रार पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली होती.शुक्रवारी सकाळी भाऊसाहेब काळे हा संपत गायकवाड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्यावेळी त्यांचे प्रकरण मिटविण्यात आले.
त्यानंतर देविदास काळे व भाऊसाहेब कांबळे याने कट करून पाळत ठेवून दुपारी संपत गायकवाड हे न्यायालयाच्या गेटमधून बाहेर पडत असताना देविदास काळे याने कुऱ्हाडीच्या साहयाने डोक्याच्या मागील बाजूस घाव घालून प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असुन त्यामध्ये ते जबर जखमी झाले त्यानंतर थोड्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये गायकवाड यांनी धाव घेतली त्यांचा पाठोपाठ देविदास काळे हा त्यांच्या मागे पोलीस स्टेशन मध्ये आला.
त्यानंतर गायकवाड यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले होते.जखमी संपत गायकवाड यांच्या पत्नी संगिता गायकवाड यांच्या फिर्यदिवरून पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये देविदास काळे आणि भाऊसाहेब कांबळे यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे करत आहेत.
