Breaking News

अनधिकृत मासेमारी करणार्‍या पर्ससीन ट्रॉलरवर मालवणमध्ये कारवाई

सिंधुदुर्गनगरी, दि. 17, नोव्हेंबर - मालवण सर्जेकोट समोरच्या समुद्रात फक्त दहा वाव खोल समुद्रात अनधिकृत मासेमारी करणारा मलपे उडुपी इथला पर्ससीन हायस्पीड ट्रॉलर मालवण सागरी पोलिसांनी आज ताब्यात घेतला. पुढील दंडात्मक कारवाईसाठी हा ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातल्या मलपे उडुपी इथल्या गणेश पालन यांच्या मालकीचा हा ट्रॉलर आहे.

मत्स्य व्यवसाय कार्यालयात मागील काही वर्षांपासून अधिकार्‍यांची नेमणूक न झाल्याचे कारण देत अजूनही मत्स्य व्यवसाय अधिकारी अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत आहेत. संतप्त पारंपारिक मच्छीमारांनी संघर्ष करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांनी मच्छीमाराना कायदा हातात न घेण्याचे आवाहन करीत आपल्या सागरी पोलिसांना अनधिकृत मासेमारी करणार्‍या ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या प्रमाणे सागरी पोलीस आपली जबाबदारी चोख बजावताना दिसून येत आहेत मात्र सुरक्षेची जबाबदारी सुद्धा असणार्‍या पोलीस दलावर ही जबादारी किती दिवस देणार आहोत याचा विचार शासनाने करून त्वरित मत्स्य खात्यातील अधिकारी भरती करावी अशी मागणी स्थानिक मच्छिमारांमधून केली जात आहे. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी या ठिकाणी भेट देऊन ट्रॉलरची पाहणी केली. तसच मत्स्य अधिकार्‍यांना योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.