Breaking News

जास्त उत्पादनासाठी पंचसुत्रीचा वापर करा - कृषीभूषण माने


ऊस हे एकमेव शाश्‍वत पिक असून कमी पाण्यात,कमी खर्चात जास्त उत्पादन होवू शकते. एकरी शंभर टन किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक पध्दतीच्या पंचसुत्रीचा वापर केल्यास निश्‍चित फायदा होईल, असा सल्ला कृषीभूषण संजीव माने यांनी शेतकर्‍यांना दिला.
सहकारमहर्षी भाऊसाहेेब थोरात साखर कारखान्याच्यावतीने अमृतेश्‍वर प्रेरणास्थळ येथे आयोजित भव्य ऊस विकास मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, अरुण देशमुख, आर. बी. रहाणे, संपतराव गोडगे, नवनाथ अरगडे, संपतराव डोंगरे, आर. एम. कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी कृषीभूषण माने म्हणाले कि, माजी मंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सहकाराचे पंढरपूर ठरला आहे. हा कारखाना इतरांना कायम मार्गदर्शक आहे, येथे शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक यांच्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहे. शेती हा व्यवसाय मोठा अडचणीचा असून ऊस हे एकमेव शास्वत पिक आहे. आता शेतकर्‍यांनी कमीत कमी एकरी शंभर टन किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन घेतले पाहिजे. यासाठी जमिनीची सुपीकता, ऊस लागवड करण्याची पध्दत, रासायनिक खतांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन व पिके संरक्षण या पंचसूत्रींचा वापर करुन ऊस उत्पादकता वाढेल.

अ‍ॅड.माधवराव कानवडे म्हणाले कि, संगमनेर तालुका हा अवर्षण असून अत्यंत कमी पाऊस या तालुक्यात होत असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ५५०० मेट्रीक टन नवीन कारखाना व ३० मेगावॅट विज निर्मिती संच कार्यान्वीत झाला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात ८ लाख मेट्रीक टन ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे.शेती क्षेत्र वाढणार नाही मात्र प्रत्येक शेतकर्‍याने एकरी उत्पादन वाढविले तर कारखान्याला भाव देणे ही परवडेल आणि शेतकर्‍यांना कमी जागेत कमी जास्त उत्पादन व पैसे मिळतील.

अरुण देशमुख म्हणाले कि, ऊसाला जास्त पाणी लागते हा मोठा गैरसमज असून शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ठिबक केले पाहिजे. ठिबक सिंचनासाठी मोठे अनुदान असून रासायनिक खते ही आपण ठिबक मार्फत देवू शकतो.शेती हा मुख्य व्यवसाय मानून शेती वेळ द्या असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. डॉ.अनिल दुरगुडे म्हणाले कि, जमीन ही आई असून तीचे आरोग्य जपले पाहिजे. ठिबक वापरल्याने पाणी व रासायनिक खतांची ३० टक्के बचत होईल यामुळे आंतरपीक घेवून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढेल.प्रत्येकाने शेतीतील माती परिक्षण करुन घेणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले.यावेळी अनेक शेतकर्‍यांनी या तज्ञांना विविध प्रकारचे प्रश्‍न विचारले त्या सर्वांचे समाधान या चर्चासत्रातून झाल्याने उत्स्फुर्तपणे शेतकर्‍यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी सतिषराव कानवडे, पांडूरंग घुले, सोन्याबापू वाकचौरे, नानासाहेब शिंदे, शांताराम कढणे, संतोष हासे, बाबासाहेब गायकर, रोहिदास पवार, दिनकरराव आंधळे, बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, जगन आव्हाड, हौशीराम सोनवणे, विलास कवडे, बाळासाहेब गुरव, शांताबाई खैरे, सुनंदाताई भागवत, अभिजीत ढोले, नानासाहेब दिघे, भारत वर्पे, दत्तात्रय खुळे, मिनानाथ वर्पे, रमेश गुंजाळ, बाळासाहेब मोरे, अवधुत आहेर, सुभाष गुंजाळ, ऊस विकास अधिकारी सुरेश थोरात, शेतकी अधिकारी खर्डे, भास्कर पानसरे, शंकर ढमक, केशव दिघे, राजेंद्र कढणे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी यांनी केले, सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले. या मेळाव्यास परिसरातील सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.