Breaking News

शेतकरी आत्महत्यांमध्ये किटकनाशकांची भर

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथम शेती, दुय्यम व्यवसाय, कनिष्ठ नोकरी असायची. परंतु आज तीच  शेती कनिष्ठ दर्जावर येऊन ठेपली आहे. कदचित  वाढती लोकसंख्या, शेतीचे दिवसेदिवस होणारे तुकडीकरण, पारंपरिकता, नैसर्गिक आपत्ती, शासनाची धेयधोरणे त्यास कारणीभूत आहेत. आज ग्रामीण भागातील शेतकरी विशेषतः  नापिकी, अस्थिर बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती या दृश्य प्रमुख घटकासह नित्याची वीज, बियाणे, शासकीय धोरण, पाटपाणी, बँकांची कर्जे या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत  असला तरी सध्या त्यात किटकनाशकांचीही भर पडली आहे. पाच वर्षात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या.
भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. मात्र आजमितीस बळीराजाचाच बळी जाण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. सामाजिकदृष्ट्या  विचार केला तर नोकरदार आणि उद्योजक वर्गाचे अर्थकारण समाधानकारक आहे. समाजात त्यांना मान, प्रतिष्ठा, पत आहे. याच्या उलट शेतकर्‍याबद्दल समाजमनात अविश्‍वास आहे.  त्याची कुठेही पत नाही कारण त्याचे अर्थकारण सर्वच शेती आणि हवामान यावर अवलंबून असते. ‘पर्जन्यमान असेल तर शेतकरी नाहीतर भिकारी’ अशी म्हण शेतकर्‍यात रूढ  झालेली आहे. असे असूनही त्याला ’बळीराजा ’ ही समाजमान्यता मिळाली. कारण संपूर्ण व्यवस्थेचा तो बळी ठरतो आणि प्रत्येक कामासाठी त्याचा आर्थिक बळी दिला जातो.  टीचभर पोटासाठी अन्नाची, मिठ-मिरचीची चिंता त्याला सतावते आहे. धनिकांचची मुले मोठ्या शाळेत जातात. पण याच्या मुलाला एसटीच्या पाससाठी आत्महत्या करावी लागत  आहे. मुली उपवर होऊन लग्नाची समस्या त्याला झोपू देत नाही. त्यात आजाराचं आगमन झालचं तर चार दिवस अंथरून धरायचे. कारण महागडे उपचार घेण्यास पैसा लागतो   राजीव गांधी योजना दवाखान्यात गेल्यानंतरच समजते. आयुष्यभर राब राबुनही त्याला चार भिंतीचे घर बांधता येत नाही. मिळालेच सरकारी घरकुल तर अधिकारी त्याच्या वाट्याला  फक्त देवघराचा प्रसाद देऊन  मलिदा तेच लाटतात. सध्या दिवसभर राबायचं आणि रातभर जागेची सजा महावितरण कंपनीकडून या बळीराजाला दिली जाते.       निसर्गाने साथ  दिलीच आणि  बियाणात फसवणूक झाली तर वर्ष वाया जाते. तक्रार करुनही कृषी विभागाचे कानावर हात असतात. शेतीशी निगडीत किटकनाशके, शेती अवजारे यांच्या मुळातच  उत्पादनावर किंमत जास्त लावली जाते. त्या छापील किमतीपेक्षा दुकानदार कमी कशी लावतात हा संशोधनाचा भाग आहे.
नुकतीच कुठलीही पुर्व सूचना न देता महावितरणने कृषीपंपाची विज कापली.स्वतःच्या चुकांवर पांघरुण घातल जात. बिलांविषयीची अनियमितता, रोहीत्र पुरविण्यासाठीचे अर्थकारण  आणि सेवा मात्र महावितरण यावेळी नजरेआड कसे करत. तरी कुणाचीही काही तक्रार नाही. शेतकर्‍याला ही माणूस म्हणून जगण्यासाठी सर्वच घटकातून विचार होऊन शेतकर्‍याला  या संक्रमन काळातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेने त्याकडे माणूस म्हणून बघण्याची गरज आहे.