Breaking News

राशिन-खेड मार्गावर दिशादर्शक फलकांअभावी वाहने दिशाहीन


खेड/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील राज्यमार्गावरील राशिन-खेडच्या दरम्यान दिशादर्शक तसेच माहिती फलक लावले नसल्याने वाहने दिशाहीन होत आहे .त्यामुळे माहिती फलकांचा मुद्दा महत्वाचा ठरत आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याबाबतीत गाफील दिसत आहे.

कर्जत-बारामती राज्य मार्गावरून प्रवास करत असताना करपडी या गावाच्या वळणावर वाहन आले की, कित्येक वाहने सरळ शिंपोरा-बाभूळगाव या दिशेने जातात. सात-आठ किलोमीटर पुढे गेल्यावर आपण चुकीच्या रस्त्याने गेल्याचे चालकांच्या लक्षात येते.आपण रस्ता चूकल्याचे लक्षात आल्यावर वाहने पुन्हा माघारी येतात.


या वळणावर कोणतेच दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालक व प्रवाशांची दिशाभूल होत आहे.त्यामुळे अनेक वर्षापासुन त्याचा मनस्ताप होत आहे.रस्त्याच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलेआहे.अनेक जीव गेल्यावर या रस्त्याची डागडुजी होते खरी, पण या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडुपे,दिशादर्शक फलक,ठराविक ठिकाणी गतीरोधक,न भरलेल्या साईडपट्ट्या,नदी-बंधारे आदी ठिकाणी संरक्षक कठडे या सर्व बाबींचा अभाव दिसून येत असल्याने सध्या कर्जत-बारामती राज्यमार्ग धोक्याचा बनत चालला आहे.

राज्यमार्गावर करपडी या ठिकाणावर असलेले वळण हे काटकोन स्वरूपात आहे त्यामुळे सर्व वाहने दिशादर्शक फलकाअभावी सरळ पुढे जातात. तर काही वाहने गोंधळून अपघात होतात.या ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.रात्री अपरात्री तर रस्ता चुकलेली वाहने लूटमारीच्या भक्षस्थानी पडत आहेत.डोळ्यांत मिरचीची पुड टाकणे,दोरखंडाने बांधणे,रस्त्यात दगड आडवे ठेवून वाहने अडविणे ,प्रसंगी आर्थिक व शारीरीक नुकसान केले जाते. असे प्रकार घडू नयेत म्हणून कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे.

अक्षम्य दुर्लक्ष- राज्यमार्गावरील करपडी या ठिकाणी असलेले वळण हे अत्यंत धोकादायक आहे.वाहनांचे अपघात होतात,रस्ता चूकल्याने वाहनाची लूट केली जाते.या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी अनेकवेळा केली मात्र अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. - सुनील काळे,माजी सरपंच,करपडी .---