Breaking News

भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे शहर काँग्रेस तर्फे सामूहिक वाचन

अहमदनगर/प्रतिनिधी। 26 -  शहर जिल्हा काँग्रेस तर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला, यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण,ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सकट,उत्तर महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष मुन्नाशेट चमडेवाले,युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव ढोणे, सरचिटणीस उबेद शेख,भिंगार महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव, युवक काँग्रेसचे मुबीन शेख,अज्जूभाई शेख,मयूर पाटोळे, एन.एस.यु.आय शहराध्यक्ष दानिश शेख,हारून इनामदार,अमित चव्हाण,अनिल चांदणे, शुभम शिर्के, सचिन गायकवाड आदींनी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. 


यावेळी पदयात्रा काढून भारतीय संविधान प्रास्ताविक पत्रकांचे वाटप सर्व सामान्य नागरिकांना करण्यात आले. यावेळी दीप चव्हाण यांनी संविधान दिवसाचे महत्व विशद करतांना सांगितले कि, ज्या संविधानामुळे आज भाजपा पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाला देखील संविधानाचा विसर पडलेला आहे, घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळे 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात भारताचे संविधान लिहिले गेले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले. भारताचे संविधान दि.26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान सभेत अंगीकृत आणि अधिनियमित करून भारताच्या जनतेने स्वतः प्रत अर्पित केले.हे संविधान दि.26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले आहे. 

या ऐतिहासिक घटनेला 67 वर्ष आज पूर्ण झाली. हे मान्य करावे लागेल कि, भारताच्या सुविधांच्या प्रास्ताविकेची माहिती अजूनही बर्‍याच नागरिकांना,अधिकारी व कर्मचारी यांना नाही. ज्या संविधानानुसार देशाच्या व राज्याचा राज्यकारभार चालतो,ज्या संविधानानुसार शासकीय व प्रशासकीय व्यवस्था व यंत्रणा निर्माण झाली, त्या संविधानाची ओळख आम्हा भारतीयांना असणे अत्यावश्यक आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून राज्यभर दरवर्षी साजरा करण्यात यावा यासाठी शासनाकडे तसा प्रस्ताव देण्यात आला व राज्य शासनाने तो प्रस्ताव 24 नोव्हेंबर 2008 रोजी मान्य करून 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचा शासनादेश काढला.