Breaking News

ज्ञानेश्‍वर महाविद्यालयास नॅकचा ‘अ’ दर्जा

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासे येथील ज्ञानेश्‍वर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) अ श्रेणीचे मानांकन मिळाले.  सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाच्या इतिहासातील हा मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी व्यक्त केली.
सोनई सारख्या ग्रामीण भागात 1979 मध्ये उभ्या राहिलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेची आतापर्यंतची प्रगती नेत्रदीपक आहे. संस्थेचे संस्थापक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी  घालून दिलेल्या शिस्तबद्ध मूल्यांच्या पायावर संस्था उभी राहिली. अलीकडच्या काही वर्षांत, विशेषतः प्रशांत गडाख यांनी संस्थेचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर खर्‍या अर्थाने या  ज्ञानमंदिराच्या कळसाला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. यापूर्वी महाविद्यालयाला नॅकचा ’सी’ दर्जा मिळाला होता. प्रशांत गडाख यांनी सोनई येथील महाविद्यालयास ’अ’ दर्जा प्राप्त  झाल्यावर आता पुढील लक्ष ’नेवासे येथील ज्ञानेश्‍वर महाविद्यालय’ असे जाहीर करत कोणत्याही स्थितीत अ दर्जा मानांकन मिळवण्याचा चंग बांधला. संस्थेचे सर्व पदाधिकारी,  प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यासाठी अपार मेहनत घेतली. गुणात्मक वाढीसाठीही विशेष लक्ष देण्यात आले. नव्याने 13 व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम, अभ्यासक्रम  निवडीसाठीचे 4 पर्याय, विद्यार्थ्यांचा कमवा व शिका योजने व राष्ट्रीय सेवा योजनेत वाढता सहभाग, अद्यावत ग्रंथालयातली हजारो पुस्तके यामुळे स्पर्धा आणि त्यातून गुणात्मकता  वाढविण्यास मदत झाली. सध्या या महाविद्यालयात 2 हजार 671 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नॅककडून अलीकडेच महाविद्यालयाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले.
गडाख यांन हे महाविद्यालय अंतर्बाह्य बदलून टाकले. वसतिगृहे, वर्गखोल्या यांना आधुनिक टच देत त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. जुने फर्निचर हटवून आकर्षक रंगसंगतीचे  नवीन फर्निचर करण्यात आले. अडगळीत पडलेल्या अनेक महत्वाच्या वस्तू काचेच्या कपाटात चमकू लागल्या. कॉलेजचा परिसर वाय-फाय करण्याबरोबरच वेबसाईट तयार झाली.
बागबगीच्याला आखीव-रेखीव रूप देतानाच हजारोवर झाडे शोभा वाढवू लागली. नॅकचा निर्णय इंटरनेटवरून झळकल्यावर (नॅक) अ दर्जा मिळाल्याची बातमी समजताच विद्यार्थी,  पालक, प्राचार्य, प्राध्यापकांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या निर्णयाचे प्राध्यापक, शिक्षेकेतर सेवकांनी महाविद्यालय परिसरात फटाक्याची आतषबाजी  करत पुन्हा दिवाळी साजरी केली.
संस्थेचे संस्थापक माजी खासदार यशवंतराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य  अरुण घनवट, सोनईचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, डॉ. अशोक शिंदे आदींनी आनंद व्यक्त केला.