Breaking News

मालवणमध्ये पहिले अ.भा. मूळव्याध परिसंवाद सत्र

सिंधुदुर्गनगरी, दि. 24, नोव्हेंबर - मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत मूळव्याध व तत्सम आजार या विषयावरील पहिले अखिल भारतीय तीन दिवसीय परिसंवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील एकूण 500 हून अधिक डॉक्टर या परिसंवाद सत्रात सहभागी होत असून 24 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या परिसंवाद सत्राचे उदघाटन होणार आहे. 


आयुर्वेद प्रोक्टोलॉजी असोसिएशन व गोकुळ व्रज फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन व सिंधुदूर्ग जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सहकार्याने परिसंवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. महेश सांघवी व डॉ. राजेश गुप्ता यांनी दिली.तीन दिवस चालणार्‍या परिसंवाद सत्रात मुळव्याध व तत्सम आजारावरील शस्त्रक्रियांचे लाईव्ह सादरीकरण 500 डॉक्टरांसमोर केले जाणार आहे. 

यावेळी 24 रोजी होणार्‍या उदघाटन कार्यक्रमास सिंधुदूर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा अधिकारी डॉ. योगेश साळे, महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडियन मेडिसिनचे चेअरमन आशुतोष कुलकर्णी, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ दीपक तुपकर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. 

परिसंवाद सत्रात देशातील नामांकित डॉ. संदिप कुमार (लखनऊ), डॉ. शिवजी गुप्ता (बनारस), डॉ. प्रवीण गोरे (मुंबई) यासह डॉ. राजेश गुप्ता, डॉ. महेश सांघवी, डॉ. विद्या धरणे, डॉ. मनीष धुरी, डॉ. आनंद कुलकर्णी व टीम उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता परिसंवाद सत्राचा समारोप आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुळव्याध व तत्सम आजारावरील तत्सम शिबिरात डॉ. सांघवी व गुप्ता यांनी 95 रुग्णांची मोफत तपासणी केली. यातील 61 रुग्णांवर 24 व 25 नोव्हेंबर रोजी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे मोफत शस्त्ररिया केली जाणार आहे. डॉ. महेश सांघवी, राजेश गुप्ता, विद्या धरणे व अन्य तज्ञ डॉक्टर टीमने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे मुळव्याध व तत्सम आजारावर मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला लायन्स व लायनेस क्लबचे सहकार्य मिळाले. मालवणसह जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.