Breaking News

वाळू तस्करांची लूट ; महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष


तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून दररोज मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. दोन्ही नद्यांच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळू उपशामुळे काही ठिकाणी तर अक्षरशः नदीपात्र बदलत चालले आहे. पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण होत असताना महसूल प्रशासनाचे मात्र तालुक्यातील वाळू तस्करीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

संगमनेर तालुक्यातील या दोन्ही नद्या वाहतात. मूळ नदी पठार भागातील गावातून तर प्रवरा नदी संगमनेर शहरालगतच्या गावातून वाहते. या नद्यांमध्ये चांगली वाळू असल्याने या वाळूला बांधकाम व्यावसायिकांची चांगली मागणी आहे. या नदीपात्रातील वाळूचा अधिकृत लिलाव होत असतो. लिलावात ठरल्यापेक्षा अधिक प्रमाणत वाळूची वाहतूक केली जाते. सध्या कुठलाच लिलाव झालेला नसतांनाही वेगवेगळ्या गावातून सर्रासपणे वाळूची तस्करी केली जात आहे.

या नद्या पात्रातून वाळू तस्कर रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करतात. दररोज अनेक ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक केली जाते. थातूर मातूर कारवाई वगळता मोठी कारवाई महसूल अधिकाऱ्यांकडून केली जात नाही. काही वाळू तस्कर व महसूल खात्याचे अधिकारी यांच्या संगनमताने वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची चर्चा होतांना दिसत आहे.

नदीपात्रात पाणी असतानाही वाळूची वाहतूक सुरुच असते. वाळू तस्करांची खास टीम असून अधिकाऱ्यांशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचेही ऐकावयास मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगमनेरच्या वाळू तस्करीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरीकांमधून होतांना दिसत आहे.