...तर भारतात पेट्रोलचा दर प्रतिलिटर २५० रुपयांपर्यंत होणार !
इराण आणि सौदी अरेबिया या आखाती देशांतील तणाव वाढत असून तो शिगेला पोहोचला, तर युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात ५०० टक्के वाढ होईल. परिणामी, भारतात पेट्रोलचा दर प्रतिलिटर २५० रुपयांपर्यंत भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात हळू वाढ होत आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, अशी अपेक्षा करणाऱ्या सर्वसामान्य जनांची घोर निराशा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल जेव्हा स्वस्त होते, म्हणजे जवळजवळ ४५ ते ५० डॉलर प्रतिपिंप या दराच्या दरम्यान होते, तेव्हा आपल्या सरकारने त्या स्वस्ताईचा लाभ जनतेला न देता सरकारी खजिने भरण्याचे काम केले. त्यासाठी अबकारी शुल्कात वाढ करण्याचा मार्ग पत्करला. यामुळे जनतेला जगात तेल स्वस्त झाल्याचा फायदा मिळू शकला नव्हता.
आता आंतरराष्ट्रीय पातळीवरच खनिज तेलाचा दर वाढत असून तो साठ डॉलरच्या आसपास रेंगाळत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
