जीएसटी कमी होवूनही हॉटेल्सकडून ग्राहकांची लूट सुरूच.
जीएसटी अमलात आल्यापासून हॉटेलमध्ये खाणे प्रचंड महागले होते. हॉटेलवाल्यांनी राज्य आणि केंद्र यांचा जीएसटी ग्राहकांकडून वसूल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जाचक जीएसटीविरोधात वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षांसह विविध संघटनांकडून जीएसटी कमी करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात आला.
त्याचा परिणाम म्हणून १० नोव्हेंबर रोजी झालेल्या २३ व्या जीएसटी परिषद बैठकीत जीएसटीचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. पण देशातील काही हॉटेल मालक अजूनही पूर्वीच्या वाढीव दरानेच ग्राहकांकडून पैसे उकळत आहेत. वाढीव जीएसटीनंतर वाढलेली पदार्थांची किंमत तशीच ठेवण्यासाठी त्यांनी जीएसटीचा दर कमी केला, पण मूळ पदार्थाच्या किमतीत वाढ करून एकूण किंमत पूर्वीप्रमाणेच राहील याची दक्षता घेतली आहे.
