Breaking News

नोटबंदी : अजित पवार यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा

पुणे, दि. 06, नोव्हेंबर - नोटबंदी, शेतकरी कर्जमाफी, महागाई अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले असून याचा जाब विचारण्यासाठी 8 नोव्हेंबरला पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभरात 8 नोव्हेंबर रोजी आंदोलने करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले. 
कामठे म्हणाले की, पुण्यात टिळक पुतळा येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच दिलीप वळसे पाटील सहभागी होणार आहेत. याशिवाय पुणे जिल्हा, पिंपरी आणि पुणे शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या मोर्चात सहभागी होतील. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. तीन वर्षात भाजप सरकारने जनतेच्या कुठल्याच गरजा पूर्ण केल्या नाहीत. उलट नोटाबंदी, जीएसटीसारख्या योजना राबवून सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. आज बेरोजगारी वाढत आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जनताच रस्त्यावर उतरून विरोध दर्शविणार आहे. त्याची सुरूवात येत्या 8 नोव्हेंबरपासून होणार आहे, असेही कामठे यांनी सांगितले.