माथेफिरुचा थरार; न्यायाधीशांच्या दालनात घुसून धुडगूस
सोलापूर, दि. 04, नोव्हेंबर - न्यायालयाच्या दालनात घुसून एका माथेफिरूने महिला न्यायाधीशांच्या दिशेने लोखंडी रॉड भिरकावून धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी या माथेफिरुने न्यायाधीशांच्या समोरील संगणकाचीही तोडफोड केली. न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिसांनी माथेफिरुला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. व्यंकटेश यल्लापा बंदगी असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती न्यायालयाच्या आवारातील जिल्हा न्यायदंडाधिकारी स्मीता सचिन माने (दिवाणी स्तर) या आपल्या दालनात कामकाज करत होत्या. त्यावेळी दुपारी माथेफिरू व्यंकटेश यल्लापा बंदगी (वय 36, रा. विनायक नगर, आकाशवाणी जवळ, एमआयडीसी) हा न्यायाधीशांच्या दालनात हातात दोन लोखंडी रॉड घेऊन दाखल झाला. त्याने आपल्या हातातील एक रॉड न्यायाधीश स्मीता माने यांच्या दिशेने भिरकावला, तो रॉड संगणकाला लागला. तर दुसरा रॉड तो भिरकावणार तोच तेथील न्यायालयीन कर्मचारी शेख आणि क्लार्क जमदाडे यांनी माथेफिरुला पाठीमागून पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्मीता माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून माथेफिरू व्यंकटेश बंदगी याला जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकटेश यल्लापा बंदगी हा अशोक चौक एटीएम कॅश चोरी प्रकरणातील आरोपी होता. तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश कुरणे यांनी त्याला गुन्ह्यात दोषी धरून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या गुन्ह्यात शिक्षा ठोठावल्याचा राग मनात ठेवून माथेफिरू व्यंकटेश बंदगी याने न्यायालयात येऊन धुडगूस घातला. या प्रकरणी आरोपी व्यंकटेश बंदगी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार हे अधिक तपास करत आहेत.