Breaking News

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली - अजित पवार


सांगली, दि. 18, नोव्हेंबर - पारदर्शकतेच्या मुद्यावर राज्यात सत्तेत भारतीय जनता पक्षाचे सरकार कायदा व सुव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. या सरकारचा प्रशासनावर अंकुश राहिला नसल्यानेच आज ही वेळ आली आहे. सत्तेत येण्यापूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अशी विचारणा करणा-या या सरकारला आता सर्वसामान्य जनताच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला ? असा जाब विचारू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली.
सांगली शहर पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियाची अजित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या पत्रकार बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार सुमन पाटील व सांगली शहर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक संजय बजाज आदी उपस्थित होते.

अनिकेत कोथळे याची झालेली हत्या दुर्देवी आहे. या हत्येमागे अश्‍लिल सीडी प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी एखाद्या चांगल्या व जबाबदार पोलिस अधिकार्याकडे या प्रकरणाची जबाबदारी द्यायला हवी. या प्रकरणात दोषी पोलिस अधिकार्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. जो कोणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी असेल त्याला तातडीने निलंबित केले पाहिजे. त्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रकरण विधानसभा व विधान परिषद सभागृहात जोरदार लावून धरणार आहे. गृह विभागावर अंकुश ठेवण्यात अपयश येत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विभागाची धुरा सक्षम व्यक्तीकडे सोपवावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गत तीन वर्षात कधी नव्हे इतका गंभीर बनला आहे. ज्यांच्याकडून सर्वसामान्य जनता सुरक्षिततेची अपेक्षा करते, त्याच पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडवली जात आहे. अनिकेत कोथळे याची पोलिस कोठडीत हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली आहे. कोथळे कुटुंबियांनी संशय व्यक्त केलेल्या पोलिस अधिकार्यांवर तातडीने कारवाई होण्याची गरज आहे. याप्रकरणी कोणालाही पाठिशी घालण्याची भूमिका न घेता तातडीने कार्यवाही गरजेची होती. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य जनतेत विश्‍वास निर्माण झाला असता.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आज देवेंद्र फडणवीस यांच्या हाताबाहेर गेली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात दरोडा व खुनाच्या गंभीर घटना घडत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील रस्त्याबाबत आभाळ फाटलयं का ?, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतक-यांच्या पायावर गोळीबार करायला हवा होता, अशी बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मंत्र्यांना राज्यातील माणसे किड्या- मुंग्या वाटतात की काय, असा प्रश्‍न उपस्थित करून या राज्यकर्त्यांनी जनाची नाही, तर मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात एका महिलेला बलात्काराची धमकी मिळाली, ती महिला पोलिस ठाण्यात गेली असता आता बलात्कार झाल्यावरच तक्रार करायला ये, असे नागपूर पोलिस सांगतात. एका महिलेला मुख्यमंत्र्यांच्या शहरातच पोलिस अशा पध्दतीची वागणूक देत आहेत. आज दीड वर्षे झाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेणे पोलिस प्रशासनाचे काम आहे. मात्र पोलिस स्वतःच्या एका सहकारी अधिका-याचा तपास करीत नसतील, तर सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्‍नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियानी राज्य शासनाने दिलेली दहा लाख रूपयांची आर्थिक मदत नको आहे. पण दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांनी सांगितले. सध्याच्या राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या तपासाबाबतही या कुटुंबाने साशंकता व्यक्त करून केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत तपास करण्याची मागणी केली आहे. याशिवाय हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व या खटल्याकामी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी व सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत.