.. आणि पाहता पाहता तो जंटलमन झाला! तरुणाईने केला चमत्कार
मानवता, सहृदयता या बाबी विकत घेता येत नाहीत. त्या प्रत्येकाच्या ठायी असतात. पण त्यांचा प्रत्यय अनुभवाशिवाय मिळतही नाही. देव, ईश्वर, भगवान हा मंदीर व दगडात नसतो तर तो प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असतो. त्याचीही अनुभुती कधी ना कधी आल्याशिवाय राहत नाही. राहुरी शहर व परिसरात हा तरुण गेल्या सतरा अठरा वर्षापासून रस्त्यावर ऊन पाऊस थंडी अशा तीनही ऋतूत आपल्याच तंद्रीत सैरावैरा मळकट कळकट अवस्थेत फिरताना या तरुणांना दिसला.
त्याचा निवाराही घाणीचा परिसर. तो कुणाला त्रास देत नाही किंवा कुणाकडेही खायला व आसराही मागत नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला आधार देण्याचे व त्याचे रुपडे पालटण्याचा निर्धार राहुरीच्या काही युवकांनी केला. अशा लोकांचा काही नेम नाही, हा सामान्यांचा सरळ समज. या तरुणाने कुणालाही त्रास अथवा हानी पोहचविल्याचे उदाहरण समोर आलेले नाही. या तरुणाविषयी अनेकदा प्रसारमाध्यमातून विषय चर्चिला गेला. मात्र कुणीही पुढे आले नाही.
त्याच्या भल्याविषयी व समाजहितासाठीही प्रयत्न केल्याचे समोर आले नाही या रुणास नातलगही आहेत की नाही, हेच मोठे कोडे आहे. येथील महाविद्यालयीन युवक क्रिकेट खेळण्याच्या निमित्तानं राहुरी कृषी विद्यापीठात जात असतांना त्यांना हा तरुण दिसल. त्यांनाही याची भीती वाटायची. मात्र या सातही युवकांनी धेर्याने विचार करुन त्याच्या मानसिकतेचा अभ्यास केला.
याचे रुपडे पालटवायचे हा ध्यास मनी घेत जर याला सर्वसामान्य माणसासारखे घडवले तर याची भीती आपल्याला व समाजालाही वाटणार नाही, असा विचार करुन त्याचे रुपांतर सर्वसामान्यपणे करण्यासाठी दाढीचे व डोईवरचे केस कापून त्यास स्वच्छ आंघोळ घालण्यात आली.त्यानंतर नवे कपडे घेण्याचे ठरवत त्यांनी या मनोरुग्णास विचारणा केली.
मात्र तो काही बोलत नसल्याने त्यास खाणाखुणा करत विचारले असता त्याचा होकार येताच क्रिकेट खेळायला न जाता आपल्याला नाभिक बांधवाची आवश्यकता भासणार हे ध्यानात घेत आपलाच एक केस कर्तन करणारा मित्र मयुर दुधाडे याला राहुरी गाठत सोबत घेतले.
नवे कपडे, चप्पल व इतर सामान घेवून त्यास सोबत घेऊन कृषी विद्यापीठ गाठले. त्याची दाढी कटींग करत स्नान घालत या सातही युवकांनी त्याला पांढरा शुभ्र नवा पोशाख चढवत त्याचे बाह्यस्वरुप बदलविले. त्या तरुणाने या सातही युवकांना व त्यांच्या आठव्या केश कर्तन करणाऱ्या मित्रास हात जोडले. या प्रसंगात सर्व भावूक झाले.
या तरुणाला आधार देत त्याचा चेहरामोहरा पालटविणार्या या ध्येयवेड्या युवकांनी समाजाला आवाहन केले आहे, की राहुरी शहर व परिसरात दिसणारा आपल्यातीलच एक समाजाचा घटक असलेल्या अशा लोकांना मदतीचा हात हवा आहे. दरम्यान, हा तरुण अन्नपाण्यावाचून कृश झाला असून त्याची हाडे दिसत आहेत. तेव्हा गुणवंत व त्याच्या सारखे मनोरुग्ण जनतेस दिसले तर त्यांस घाबरण्याचे कारण नाही. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.
