Breaking News

बुलडाणा येथे शेतकरी भवनाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 02, नोव्हेंबर - बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन पीक  बहरण्याच्या काळात पाऊस येत नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदील आहे. अशा संकटसमयी शेतकर्‍यांना संकटातून मुक्त करण्यासाठी  शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतीपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.
बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मुंग व सोयाबीन शेतमाल शासकीय हमीभावाने खरेदी केंद्र, शेतकरी भवन उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  प्रमोद लहाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, उपसभापती गौतम बेगामी, नगरसेवक श्री. जायभाये, श्री. सोनोने, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
शेतकर्‍यांना आता कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचे सांगत राज्यमंत्री म्हणाले, संचालक मंडळ निवडणूकीत थेट शेतकर्‍यांना  मतदान करता येणार आहे. बाजार समिती कायद्यात सुधारणा करून राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने कर्जमाफी  देवून शेतकर्‍यांना कर्जातून बाहेर क ाढण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात जवळपास 1400 कोटी रूपयांचे कर्ज शेतकर्‍यांचे माफ झाले असून पहिल्या हप्त्यात 18 कोटी 64 लक्ष रूपये जमा झाले आहे. ही  ऐतिहासिक कर्जमाफी आहे. ते पुढे म्हणाले, सोयाबीन शेतमालाची प्रती हेक्टरी 15 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. हमीभाव 3050 रूपयांप्रमाणे ही खरेदी करण्यात  येणार आहे. कृषी साहित्य खरेदीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार बघता शासनाने ट्रॅक्टर व उपसाहित्य शेतकर्‍यांनी खुल्या बजारातून खरेदी करण्याची मुभा दिली आहे. या साहित्याचे  देयक आणून या साहित्यावरील शासनाचे अनुदान शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्हा खारपाणपट्टा असून या भागातील शेतीच्या विकासासाठी नानाजी  देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत 5 हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या भागात शेतीसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण क रण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार धृपदराव सावळे यांनी मार्गदर्शन केले. संचलन अजीम नवाज राही यांनी तर आभार प्रदर्शन श्री दळवी यांनी केले. कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक,  व्यापारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.