सुट्टीवर आलेल्या जवानाचं अपहरण करून निर्घृण हत्या.
एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शोपियान येथील आपल्या घरी आलेल्या २२ वर्षांच्या जवानाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.जवानाचे अपहरण करून खून करण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी मे महिन्यात भारतीय सैन्यातील लेफ्टनंट पदावरील एका जवानाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता.
पुलवामा इथून सुरक्षा दलाने या जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत जवानाचं नाव इरफान अहमद डार असून तो कालच आपल्या घरी आला होता. घरी आल्यानंतर काही वेळातच तो बेपत्ता झाला होता. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्याचा मृतदेह आज पुलवामाच्या जंगलात आढळून आला. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.