Breaking News

सांगलीतील बेदाणा सौद्यात 15 व्यापा-यांना बंदी

सांगली, दि. 10, नोव्हेबर - झिरो पेमेंटसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापा-यांनी गत महिनाभर बेदाणा सौदे बंद ठेवले होते. बाजार समितीकडील 15 व्यापारी  वगळता उर्वरित सर्व व्यापा-यांनी अडत्यांचे पैसे दिल्यामुळे बेदाणा सौद्यास सुरूवात करण्यात आली होती.
बेदाणा सौद्याच्या पहिल्याच दिवशी तीन हजार 400 बॉक्स बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलोला 90 ते 150 रूपये इतका दर मिळाला. मात्र त्या 15 व्यापार्यांनी अडत्यांचे  पैसे दिले नसल्याने त्यांना या सौद्यात सहभागी होऊ दिले नाही. अडत्यांचे सर्व पैसे देईपर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
याबाबत बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, बेदाणा व्यापारी मनोज मालू, विनायक हिंगमिरे, राजेंद्र कुंभार व बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक  झाली. अन्य राज्यातील व्यापा-यांकडून स्थानिक व्यापारी व अडते यांचे 100 टक्के पैसे मिळाले की नाहीत, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी काही व्यापा-यांनी  त्या 15 जणांनी अद्याप सर्व पैसे देऊ केले नसल्याने त्यांना बेदाणा सौद्यात सहभागी होऊ देऊ नका, अशी भूमिका घेतल्यानेच हा निर्णय घेतल्याचे प्रशांत शेजाळ यांनी सांगितले.