Breaking News

नुकसानभरपाईची रक्कम अदा न केल्याने पोलिस आयुक्तांची खुर्ची, टेबल जप्तीचे आदेश

औरंगाबाद, दि. 28, ऑक्टोबर - पोलिस वाहनाच्या अपघात प्रकरणात पीडितास नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश पोलिस आयुक्तालयाने पाळले नाहीत त्यामुळे येथील  पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची खुर्ची, टेबल व इतर साहित्य जप्त करण्यााचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. वसुलीच्या एका याचिकेमध्ये  न्ययालयाने जप्तीचे आदेश दिले आहेत. सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वाहनामुळे अपघात होऊन 2013 मध्ये रामचंद्र भिवसने हे गंभीर जखमी झाले व त्यांचे निधन  झाले होते. त्यानंतर भिवसने यांची पत्नी व मुलांनी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ऍड. विजयकुमार सरोदे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता.  न्यायाधिकरणाने 11 जानेवारी 2016 ला दावा मंजूर करून 7 लाख 56 हजार 46 रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता; मात्र दाव्याच्या आदेशानंतरही प्रतिवादी पोलिस  आयुक्तांनी आजपावेतो भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली नाही. म्हणून भिवसने कुटुंबीयांनी वसुलीचा दावा दाखल केला. पोलिस खात्याने आदेशित रक्कम जमा केली नाही.  त्यामुळे तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांनी पोलिस आयुक्तांची खुर्ची, टेबल, त्यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक, प्रिंटर, एसी व इतर कार्यालयीन साहित्य जप्त करण्याचा  आदेश दिला.