Breaking News

शहिद दीपक घाडगे यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी अक्षयकुमार कडून अर्थसाह्य

सातारा, दि. 23, ऑक्टोबर - फत्यापूर (ता सातारा) येथील शहिद दीपक घाडगे यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी अभिनेते अक्षय कुमार यांनी 25 हजार रुपयांचा धनादेश आणि  दिवाळीसाठी मिठाई भेट दिली. बोरगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. संतोष चौधरी यंच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात शहिद दिपक घाडगे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन धनादेश व  मिठाई, दिवाळी भेट दिली. 
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नागरे-पाटील व सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरूपात सपोनि संतोष चौधरी यांनी दीपक  घाडगे यांच्या फत्यापुर येथे घरी जाऊन ही भेट त्यांच्या कुटुंबियांना दिली. यावेळी अभिनेते अक्षय कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केलेले पत्रही दिले.अभिनेते अक्षयकुमार यांनी  आपल्या पत्रामध्ये भावना व्यक्त करताना म्हटले आहे की,आपल्या घरातील शूर शहीद विराने देशासाठी केलेले बलिदान सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपूत्राचा सार्थ अ भिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सान्निध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दु:ख हे अपार आणि  कठोर आहे. मात्र यातून आपण सावरुन धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पन करावे, ही मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो. मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी  मिठाई व त्यांच्या पुस्तकांसाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही माझी नम्र विनंती. सदैव आपल्या ऋणात असणारा आपला ...अक्षयकुमार.