Breaking News

किटकनाशक बळी प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका


नागपूर, दि. 06, ऑक्टोबर - किटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या शेतकर्‍यांच्या मृत्यूंचे प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. 
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या  खंडपीठासमक्ष सुनावणी होणार आहे.
जम्मू आनंद यांनी दाखल केलेल्या याचिकेत मंत्रालयाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले  आहे. सादर याचिकेत नमूद केल्यानुसार शेतकर्‍यांच्या मृत्यूंची न्यायिक आयोग किंवा विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व  कंपन्यांची जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना 20 लाख तर, प्रभावित शेतक-यांना 10 लाख  रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, रुग्णालयात उपचारावर झालेला खर्च शेतकर्‍यांना परत करण्यात यावा, दोषी अधिकारी, कंपन्या, वितरक व चिल्लर विक्रेत्यांवर  भादंविच्या कलम 304-भाग-2 (सदोष मनुष्यवध) व 304-अ (निष्काळजीपणा) आणि कीटकनाशक कायद्यातील कलम 29 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात  यावा. तसेच दोषी कीटकनाशक उत्पादक कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी, बाजारातील दोषपूर्ण कीटकनाशकांचा साठा तत्काळ जप्त करून दुकाने सिल करण्यात  यावीत आणि कीटकनाशक कायदा व नियमांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे.