Breaking News

विजेचा दाब वाढल्याने अनेकांच्या गृहोपयोगी वस्तू जळाल्या

औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - अचानकपणे विजेचा दाब वाढल्यामुळे हर्सूल परिसरातील नागरिकांच्या घरात असलेल्या अनेक गृहउपयोगी वस्तू जळून खाक  झाल्या. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कर्मचार्याला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. मात्र सोमवारी (दि.2) एकाही  ग्राहकाने घरातील गृहउपयोगी वस्तू जळाल्याची तक्रार ’महावितरण’कडे दिली नाही, असे पॉवर हाऊस उपविभागाचे सहायक अभियंता सचिन लालसरे यांनी  सांगितले. नागरिकांनी मारहाण केल्यानंतर लाईनमन नंदकिशोर सोनवणे हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र ते त्याच भागात राहत असल्यामुळे त्यांनी  मारहाण आणि शिविगाळ करणार्यांविरुध्द तक्रार न देता हा वाद समोपाचाराने सोडवला. नंतर रात्री आठच्या सुमारास रोहित्रावर जाऊन हर्सूल भागातील विद्युत  पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. पॉवर हाऊस विभागाचे सहायक अभियंता सचिन लालसरे यांच्याशी संपर्क साधून रविवारी घडलेल्या घटनेबाबत विचारले असता  ते म्हणाले की, ज्या ग्राहकांच्या इलेक्ट्रानिक वस्तू जळाल्या आहेत. त्यांनी रितसर अर्ज सादर केल्यानंतर तो अर्ज नियमानुसार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतो.  पंचनामा होऊन नुकसानभरपाईसाठी वरिष्ठ अधिकार्याकडे हे प्रकरण पाठविले जाते.