Breaking News

अन्यथा महसूलमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही - संभाजी ब्रिगेड

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - वाळू उपसा होत नसल्याने लाखो बांधकाम मजूर व व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. परिणामी अवैध वाळू सोन्याच्या भावात विकली जात आहे.  यामुळे डिजीटल इंडिया आणि कॅशलेसवर परिणाम होत आहे. म्हणून त्वरित अधिकृत वाळू उपशाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा कार्तिकीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत  पाटील यांना करू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकामासाठी वाळू उपलब्ध  नसल्यामुळे लाखो मजूर बेरोजगार झाले आहेत. याचा मोठा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. वाळू अभावी शासकीय कामेसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद अवस्थेत आहेत.  वाळूची कमी भरून काढण्यासाठी डस्ट वापरून निकृष्ट कामे करण्यात येत आहेत. अधिकृत वाळू उपसा बंद असल्याने अवैध वाळू व्यावसायिकांना सोन्याचे दिवस आले आहेत.
भरमसाठ किमतीने वाळू मार्केटमध्ये विकली जात आहे. याचा परिणाम शासकीय तिजोरीत जाणारा पैसा अवैध व्यवसायाकडे जात आहे. त्यामुळे डिजीटल इंडियाच्या आणि कॅशलेश  योजनेला हरताळ फासला जात आहे. जिल्ह्यातील अधिकृत वाळू उपसा बंद असल्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर होत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करून जिल्ह्यातील बांधकाम  मजूर आणि व्यवसायिकांसाठी तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा कार्तिकी वारीच्या महापूजेसाठी येणार्‍या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारण्यात येईल. त्यानंतर ही कारवाई  न झाल्यास त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी दिला आहे.यावेळी बालाजी अटकळे, स्वागत कदम,  स्वप्नील गायकवाड, बाळासाहेब बागल, संदीप फडतरे, अमोल घुले, बाळकृष्ण नागणे, सतीश चांदगुडे, संदीप पाटील, दयानंद काजळे, शाम कदम, सोमनाथ राऊत, अरुण देशमुख  आणि राकेश डोंगरे आदी उपस्थित होते.