Breaking News

पूर्णपणे विझताना दिवा फडफडतोच तसाच काँग्रेसचा विजय; नांदेडचा जनादेश आम्ही स्वीकारला - खा. रावसाहेब दानवे

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - नांदेड महापालिका निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहेच. जनता जनार्दनाने दिलेल्या कौलाचा आम्ही सन्मानच करतो, असे  भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. मात्र, कोणताही दिवा पूर्णपणे विझण्यापूर्वी थोडातरी फडफडतोच, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे  यांनी काँग्रेस नेते श्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
परतीच्या पावसाचा संदर्भ घेत, नांदेड महापालिकेतील विजय हा भाजपाच्या परतीचा प्रवास प्रारंभ करणारा आहे, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते. त्याला भाजपा  प्रदेशाध्यक्षांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आमचा विजय झाला नव्हता. गेल्या निवडणुकीत सुद्धा आमच्या दोनच जागा होत्या. त्या  आता 6 वर गेल्या. नांदेडमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी 3.81 वरून 24.64 टक्के इतकी झाली आहे, हेही विसरून चालणार नाही. आणखी पुढे जाण्यासाठी काय करता येईल,  याचे चिंतन योग्य व्यासपीठावर होईलच. असेही श्री दानवे यांनी म्हटले आहे. आजच राज्यातील इतर शहरांमधील पोटनिवडणुकांचेही निकाल लागले. मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि  नागपूर या चारही जागांवर भाजपाच विजयी झाली. अगदी अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाने दैदिप्यमान यश संपादन केले. या यशावर कितीही आरोळ्या उठ विल्या जात असल्या तरी त्याचे पुराचेही आम्ही लवकरच सादर करू. गेल्या दोन वर्षांतील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निकालांचा जणू काँग्रेसला विसर  पडला आहे, अशाच थाटात त्यांनी विधाने सुरू केले आहेत. संपूर्ण देशात भाजपाला घवघवीत यश अगदी प्रत्येक टप्प्यावर मिळत असतानाही एकट्या नांदेडच्या निकालाने काँग्रेसने  हुरळून जाण्याची अजीबात गरज नाही. हा परतीचा पाऊस कोणाचा मान्सून संपविणार, हे आम्ही दाखवून देऊ, असेही त्यांनी श्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.