Breaking News

ग्रा.पं. निवडणूक; पानचिंचोलीत तुंबळ हाणामारी ,पोलिसांचा लाठीमार

लातूर, दि. 04, ऑक्टोबर - लातूर नजीक पानचिंचोलीत येत्या सात तारखेला ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करीत  या गावातील काही कार्यकर्त्यांनी बाहेरुन आलेल्या गटाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यात वाहनांच्या काचा फुटल्या. मोठ्या प्रमाणावर हाणामारीही झाली. घटना  कळताच निलंग्याहून अधिकार्‍यांसह फौजफाटा दाखल झाला. राखीव पोलिस दलाची तुकडीही पाचारण करण्यात आली. गावातील तणाव नियंत्रणात आणण्यासाठी  पोलिसांना लाठीमार करावा लागला. दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या मिळून नऊ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 19 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.  गावात जमावबंदी 144 कलम लागू करण्यात आले आहे. ही घटना घडताच गावातील बाजार, दुकाने बंद करण्यात आली. केवळ दवाखाने आणि औषधी दुकाने सुरु  आहेत.
10 हजार लोकसंख्या असलेल्या पानचिंचोली गावात 4500 मतदार आहेत. विद्यमान ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. सेनेने याहीवेळी पॅनल उभे केले आहे.  त्यांच्या विरोधातील पॅनलला मदत करण्यासाठी बाहेरुन लोक आले होते, त्यांनी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला गेला. जनता पॅनल आणि परिवर्तन  पॅनलच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली, यात पाचजण जखमी झाले अशी माहिती मिळाली आहे.