Breaking News

सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर राज्यातील सहकारी संघांना अडचणीतून बाहेर काढून अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.  सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकारी संस्थांमध्ये ज्या सुधारणा करणे आवश्यक आहेत. त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सहकारी संघाला यापूर्वी शिक्षण  आणि प्रशिक्षणासाठी जो निधी मिळत होता तो पुन्हा सुरु करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मारिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात राज्य सहकारी संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सहकारी संघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा शतक महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, सहकार संघाला शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी देण्यात येणारा निधी पुन्हा सुरु करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल .सहकार  सक्षमीकरणासाठी ज्या काही सुधारणा करणे आवश्यक आहे त्यासाठी शासन सकारात्मक असून शासनाचा संस्कारीत सहकार निर्मितीवर अधिक भर आहे. शासन  सहकार क्षेत्र अधिक भक्कम कसे होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून  देण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्था सक्षम झाल्या पाहिजेत त्यादृष्टीने शासन निर्णायक वाटचाल करत आहे.एखाद्या संस्थेचा 100 वर्षाचा प्रवास पूर्ण  होतो तेव्हा तो काळ फार महत्वाचा आणि संस्थेच्या कार्याला तपासण्या बरोबरच पुढच्या 50 वर्षाचे नियोजन करण्याचा असतो.त्यामळे हे शतक महोत्सवी वर्ष अत्यंत  महत्वाचा आहे.या सहकारी संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सहकारी संघाचे अभिनंदन केले  आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.