Breaking News

कामाची होणार एनएबीएल प्रयोगशाळेत तपासणी

पुणेे, दि. 06, ऑक्टोबर -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रस्ते, पूल, इमारती, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उद्यान आदी विविध कामे  करण्यात येतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याचा वापर होतो. आता या साहित्याची एनएबीएल या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.  महापालिकेच्या कामांची गुणवत्ता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतरच संबंधित ठेकेदारास बिल अदा केले जाणार  आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत उड्डाणपुलाची अनेक कामे सुरू आहेत. रस्तेबांधणीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा, ड्रेनेज,  उद्यान, विविध कामासाठी इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी बांधकाम साहित्याचा वापर केला जातो. या बांधकाम साहित्याची मान्यताप्राप्त  एनएबीएल प्रयोगशाळेतून तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. बरेच बांधकाम साहित्य हे मान्यता नसलेल्या प्रयोगशाळेत तपासणी करून  ठेकेदारांची बिले अदा केली जातात. यामध्ये या साहित्याच्या गुणवत्तेची हमी देणे शक्य होत नाही.
सर्व एनएबीएल प्रयोगशाळांचे सरकारी यंत्रणेमार्फत ऑडिट होत असल्याने एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील अहवालाच्या गुणवत्तेची हमी असते. एनएबीएल  प्रमाणपत्र हे क्वॉलिटी काऊंसिल ऑफ इंडियाचा अखत्यारित असल्याने फक्त योग्य गुणवत्ता असलेल्या प्रयोगाशाळांना हे प्रमाणपत्र देण्यात येते.
यापुढे महापालिकेच्या वतीने होणा-या सर्व स्थापत्य व इतर कामांमध्ये सर्व बांधकाम साहित्याची तपासणी ही एनएबीएलची मान्यता असलेल्या गुणवत्तापूर्व  प्रयोगशाळेतून करणे बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारच्या पाच ते सहा प्रयोगशाळा उपलब्ध असल्याने महापालिकेच्या कामांची गुणवत्ता राखणे शक्य होईल. सर्व  विभागांतील स्थापत्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उद्यान आदींमध्ये वापरलेल्या बांधकाम साहित्याची एनएबीएल प्रयोगशाळेमधून तपासणी केल्यानंतरच ठेकेदारांना बिल अदा  करणे सक्तीचे केले आहे. या निर्णयाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.