Breaking News

विंचू दंश तर करणारचं....!

दि. 04, ऑक्टोबर - साधु आणि विंचु या दोन प्रवृत्ती, दोघांचा धर्म वेगळा म्हणून कर्मही वेगळे. अगदी परस्पर विरोधी एक परोपकारी तर दुसरा अपकारी. दोन भिन्न  मार्ग असलेल्या या दोन प्रवृत्ती खरेतर एकञ येण्याचे कारण नाही. असे आपण समजतो. पण नियतीचा खेळ का कुणा कळला, मुळी तो निराळा.ते एकञ येतात  भेटतात एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर आपला धर्मही निभावतात. साधुने विंचवाला कित्येकदा जीवनदान दिले तरीही साधूचे उपकार विसरून दंश करण्याची  प्रवृत्ती माञ विंचू सोडत नाही. या सारखीच सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे.
सत्तर वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या  प्रमाणात सत्तास्थानी झालेला बदल नाही म्हटले तरी पचवायला सामर्थ्य हवे ते देशाच्या नागरीकांमध्ये अजून पुरेपुर  उतरलेले दिसत नाही. अचानक झालेल्या सत्ता बदलाने ज्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले ते आणि ज्यांना अनपेक्षितपणे पहिल्यांदाच सत्ता पाहीली ते असे  दोन्ही बाजूची मंडळी अस्वस्थ झाली आहे. बावचळली आहे.खाली आलेले  वरच्या मंडळींविषयी भुईवर पाय आपटून थयथयाट करीत आहेत तर दुसरीकडे राक्षसी  बहुमताचा अहंकार ओथंबून सांडणारे हर्षवायूच्या साथीत बाकीच्या मंडळींवर जन्मोजन्मीचे वैर असल्यागत सुड उगवू लागलेत.या साठमारीत ज्याच्या नावामुळे हा  सारा खेळ सुरू आहे,ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था कथेतल्या साधूसारखी झाली आहे. (याचा अर्थ मोदींना आम्ही साधूत्व बहाल केले असा कुणी  घेऊ नये.) मग आपल्या आजच्या पटकथेतील विंचू कोण हे वेगळे सांगण्याची गरज आहे का?
कुठल्या एका पक्षाची भाटगीरी करण्याची आमची परंपरा नाही, त्याहूनही प्रवृत्ती तर मुळीच नाही.नाठाळाच्या माथी हाणू काठी, भले तरी देऊ कासेची लंगोटी हे संत  वचन नजरेसमोर ठेवून आमच्या या स्तंभाची वाटचाल सुरू असल्याने कुणाचाही मुलाहिजा न बाळगता खर ते आमचं ही भुमिका आमची असते, म्हणूनच वास्तवाला  अव्हेरून पुढे जाण्याचे पातक आमच्या हातून घडत नाही, असो.
तात्पर्य एव्हढेच  की आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत दोन्ही किनार्यांवर विंचवांच्या लगड नांग्या ऊभ्या करून सज्ज आहेत तर या देशाला खर्या अर्थाने  बदलाच्या नावेत बसवू पाहणारे या दुष्टांच्या कळपात एकटे सापडले आहेत.
मोदींच्या नावावर सत्तेची उब घेणारे सत्तापिपासून चांगल्या गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी जेव्हढ्या तत्परतेने पुढे सरसावतात तितक्याच तत्परतेने एखाद्या नकारात्मक गोष्टींचे  खापर मोदींच्या डोक्यावर फोडून आपला कार्यभाग उरकून घेतात. अवघ्या तीन वर्षात भाजपा सरकारने केलेली कामगीरी सांघिक यश सांगतात. काँग्रेसच्या काळातील  घोटाळे सांगतांना गेल्या साठ पासष्ट वर्षात केलेली प्रगती माञ सोयीस्करपणे विसरतात. दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि समविचारी मंडळी मोदींच्या सकारात्मक कामाचे  श्रेय स्वकालीन कारभाराला देताना सध्या देशात दहशतवादी कारवायांच्या हैदोसाला त्यांच्याच सरकारची निती कारणीभूत आहे हे सोयीस्करपणे विसरतात. थोडक्यात  स्वपक्ष आणि विरोधी पक्षात असलेली विंचवाची जातकुळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार दंश करण्याची संधी साधत आहेत.
मोदींनी रेशन कार्ड, एलपीजी गँस, मनरेगा व इतर सर्व सरकारी लाभार्थ्यांना आधारशी जोडल्यामुळे आतापर्यंत सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्या दलालांची आता  जबरदस्त पंचाईत झाली आहे.ही कारवाई करून मोदींनी आता पर्यंत दरवर्षी दलालांच्या घशात जाणारे हजारो कोटी रूपये वाचवलेत. हा सिलसिला  यापुढेही असाच  सुरू राहणार या भितीने दलाल मंंडळी बिथरली.ही मंडळी कुणा एका पक्षाची नाही दोन्ही किनार्यांवर त्यांचे तळ आहेत.स्वातंञ्योत्तर भारतात प्रथमच काही प्रमाणात  देशहिताचे निर्णय होण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने विंचवांचा स्वाभीमान जागा झाला आणि दंश करण्याची मुळ प्रवृत्ती ते जपत आहेत.एव्हढाच काय तो आजच्या  गलगलाटाचा अर्थ आहे.